नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती चौक परिसरात दिवसाढवळ्या महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे. नरहर नगर येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात आरोपीने जबरदस्तीने तोडून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. कांताबाई भगवान शिंदे (वय 50) या आपल्या घरासमोर उभ्या असताना अचानक एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने तोडले आणि क्षणार्धात घटनास्थळावरून फरार झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 87/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. शहरात वाढत्या चोऱ्या व हिसकावून नेण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
