इराण–इस्त्रायल संघर्षाचा भडका आता धगधगत नाही, तर उघडपणे भडकत आहे. अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता सरळ युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इराणकडून लक्ष्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यात इज्राएल चे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू याना टार्गेट नंबर वन म्हणून नाव घोषित केल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना इस्रायलने स्पष्ट शब्दांत सांगितले इराणसोबत आता कोणतीही चर्चा नाही. उलट, पहिला हल्ला करण्याची थेट धमकीही दिली गेली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा सूर लावला आहे. त्यांच्या मते, इराणसोबत सुरू असलेल्या चर्चांना यश येऊ शकते. त्यांनी इराणला एक महिन्याची मुदत दिल्याचे जाहीर केले असून 13 मार्चपर्यंत युद्ध होणार नाही, असे संकेत दिले. मात्र, ही मुदत तोंडी असली तरी रणांगणाची तयारी मात्र प्रत्यक्षात सुरूच आहे. 13 मार्चपर्यंत अणुकरार न झाल्यास निर्णय युद्धानेच होईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

अमेरिकाने इराणची चारही बाजूंनी घेराबंदी केली आहे. दोन विमानवाहू युद्धनौका सज्ज आहेत त्यापैकी एक USS Abraham Lincoln गल्फ ऑफ ओमानजवळ तैनात आहे, तर दुसरी USS Ford इराणच्या दिशेने सरकत असल्याची माहिती आहे. या नौकांवर अत्याधुनिक शस्त्रसज्जता असून अण्वस्त्र क्षमताही असल्याचे सांगितले जाते. मध्यपूर्वेतील तळांवर उतरलेली अमेरिकी लढाऊ विमाने आता युरोपकडे स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, इटली कडे वळवली गेल्याची हालचाल दिसते. स्पष्ट संकेत आहे. राजनैतिक चर्चा सुरू असल्या तरी लष्करी बळाचा दबाव कायम आहे.
इराणकडून कठोर भूमिका समोर आली आहे. त्यांच्या लष्करी नेतृत्वाने जाहीर केले की, चर्चेसाठी आम्ही कधीच मागे नाही; पण आमच्या क्षमतेचा कमी लेख करू नका. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पूर्णतः सज्ज असल्याचा दावा केला जातो. ‘खुर्रम शहर-४’सारख्या नव्या क्षेपणास्त्रांचा उल्लेख होत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, इराणकडे एकाच वेळी हजारो क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे. 2020 मधील हल्ल्यांची उदाहरणे देत इराण आपली प्रतिकारशक्ती दाखवत आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी ही थेट युद्धाची स्थिती आहे. इराणकडून जाहीर झालेली टार्गेट लिस्ट म्हणजे उघड आव्हान आहे. दुसरीकडे, इराणमध्ये 11 फेब्रुवारीला झालेल्या प्रदर्शनांमध्ये जनतेने अमेरिका व इस्रायलविरोधी कठोर भूमिका घेण्यास सरकारला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसले.इराणमध्ये सहा हजार स्टारलिंक उपकरणे जप्त केल्याची बातमी समोर आली आहे. यावरून गुप्त नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जातो. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आणि इस्रायलची Mossad यांच्याकडून इराणमध्ये अंतर्गत हालचाली घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तेहरानकडून केला जातो.
एकीकडे अमेरिका शांततेचा मार्ग म्हणून बैठकांचे आवाहन करते; तर दुसरीकडे अब्जावधींच्या व्यवहारांची समीकरणे मांडते. इराण मात्र उघडपणे सांगते सन्मानाने चर्चा हवी; दबावाखाली नाही. त्यांची भूमिका स्पष्ट आहे: कोणत्याही परिस्थितीत इस्रायलला रोखायचे आणि अमेरिकेचा प्रभाव या प्रदेशातून कमी करायचा.एकंदरीत चित्र भयावह आहे. वरकरणी चर्चा, आतून युद्धतयारी. शब्दांत शांतता, कृतीत शस्त्रांची खणखण. 13 मार्च हा केवळ एक दिवस नाही; तो या संघर्षाच्या भवितव्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर अणुकरार झाला नाही, तर मध्यपूर्व पुन्हा एकदा ज्वालामुखी ठरेल आणि त्याचे पडसाद संपूर्ण जगाला भोगावे लागतील.

