नवीन नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काल पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा नांदेड ग्रामीण पोलिसांनी काही तासांतच पर्दाफाश केला असून हा गोळीबार बनावट असल्याचे तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे स्वतःवर गोळीबार करून घेत तक्रार दाखल करणारा शेख शमी उर्फ अरबाज शेख रऊफ (वय २५, रा. मदनी कॉलनी, मस्जिदजवळ, नांदेड) यालाच आता आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नंतर सुमारे तीन वाजता अरबाज याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यात त्याने नमूद केले होते की, तो स्कुटी उभी करून थांबला असताना दोन दुचाकी वाहनांतून आठ जण आले. त्यापैकी सय्यद अवेज, शाहरुख कबूतर आणि अबू शूटर यांना तो ओळखत असल्याचे सांगितले होते. उर्वरित पाच जण अनोळखी असल्याचे त्याने म्हटले होते. आरोपींकडे बंदुका व तलवारी होत्या. सय्यद अवेज याने शिवीगाळ करत त्याच्यावर गोळी झाडली असून ती गोळी त्याच्या उजव्या हाताच्या दंडाला लागली, तसेच एक गोळी स्कुटीच्या सीटला लागल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक १२४ / २०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, वसंत केंद्रे, पचलिंग, शेख समीर, शंकर माळगे, हनुमंता कदम आणि कल्याणकर यांच्या पथकाने या घटनेचा तपास करत काही तासांतच सत्य उघड केले. तपासात समोर आले की, डिसेंबर २०२५ मध्ये अरबाज याच्याकडे गावठी पिस्तूल सापडले होते. याबाबतची माहिती सय्यद अवेज, शाहरुख कबूतर आणि अबू शूटर यांनी पोलिसांना दिल्याची शंका अरबाजला होती. त्यातून बदला घेण्याच्या उद्देशाने अरबाजने स्वतःवर गोळीबार करून घेत बनावट हल्ल्याचा बनाव रचून तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणत तक्रारदार असलेल्या अरबाजलाच आरोपी केले असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित बातमी .. नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला, Kanthak Suryatal Post Views: 1,737 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महापौर व उपमहापौर यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी सौर कृषी पंप योजनेत लाच प्रकरण; लाईनमन संतोष बोयाळणे एसीबीच्या जाळ्यात