नांदेड (प्रतिनिधी)- सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिबगाव सर्कलचा लाईनमन संतोष बोयाळ (वय ३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ फेब्रुवारी रोजी रंगेहात पकडून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी एका तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलांचे वाणेगाव (ता. व जि. नांदेड) येथे शेती आहे. या शेतासाठी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे ३० सप्टेंबर २०२५ रोजी वाघी (ता. नांदेड) येथील सीएससी केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आला होता. यासाठी आवश्यक शुल्कही भरले होते. यानंतर ४ फेब्रुवारी रोजी लिमगाव सर्कलचे लाईनमन संतोष बोयाळ हे ऑनलाईन सर्वेक्षणासाठी संबंधित शेतात आले. त्यावेळी त्यांनी ऑनलाईन अहवाल सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, ४, ५ आणि ६ फेब्रुवारी दरम्यान संतोष बोयाळ यांनी फोनवर संपर्क साधून तुझे काम केले आहे, अजून पैसे दिले नाहीत, असे सांगत लाचेची मागणी कायम ठेवली. ११ फेब्रुवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. आनंदनगर चौक येथे बोयाळणे यांनी मी इतरांकडून तीन हजार रुपये घेतो, तुला किती द्यायचे ते दे, असे सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने २ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्यावर त्यांनी ती रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी बोयाळणे यांनी तक्रारदाराला नवीन मोंढा परिसरात बोलावले. आयटीआय ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गावरील गजानन पान शॉपसमोर तक्रारदाराकडून सौर कृषी पंपाचा सर्वे करून ऑनलाईन अहवाल सादर केल्याच्या मोबदल्यात २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी करीत आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संतोष बोयाळणे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 802 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये बनावट गोळीबाराचा पर्दाफाश; स्वतःवर गोळीबार करून घेणारा अरबाजच आरोपी खा. राहुल गांधींना तुरुंगात टाकण्या साठी विशेष अधिकार हनन प्रस्ताव आणणार