खोटा इतिहास, घाणेरडा प्रचार आणि सैन्याची बदनामी : १९६५ युद्धाबाबतचा पाकिस्तान प्रणीत विषप्रचार
भारतीय जनता पार्टीचा तथाकथित आयटी सेल काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करतो. त्या व्हिडिओमध्ये मुद्दाम एक विषारी प्रश्न उपस्थित केला जातो – भारतीय सैन्यात मुस्लिम रेजिमेंट का नाही? आणि त्यावर खोटे, दिशाभूल करणारे उत्तर दिले जाते की १९६५ च्या युद्धात भारताकडे मुस्लिम रेजिमेंट होती, पण ती पाकिस्तानकडे जाऊन बसली. हा दावा केवळ खोटा नाही, तर देशद्रोही मानसिकतेचा कळस आहे.
बीजेपीचा आयटी सेल वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते बनावट इतिहासापर्यंत अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा वापर करून समाजात फूट पाडतो. हिंदू-मुस्लिमांमध्ये कायम दरी राहावी, संशय टिकून राहावा आणि देश कधीही एकत्र येऊ नये यासाठी मुद्दाम विष कालवले जाते. हीच पद्धत १९४७ पूर्वी वापरली गेली आणि त्यातून देशाचे तुकडे झाले. आज पुन्हा तोच घाणेरडा प्रयोग सुरू आहे. टीसीएसचे अशोक कुमार पाण्डेय स्पष्टपणे सांगतात हे खोटे उघड करणे, सत्य जनतेसमोर मांडणे हे आमचे कर्तव्य आहे.

या अफवेची सुरुवात २०१० मध्ये झाली. पाकिस्तानच्या मीडिया यंत्रणेतून विशेषतः आयएसआयची एक विंग आयएसपीआर या प्रचार विंगमधून एक लेख प्रसिद्ध झाला. त्यात असे लिहिले गेले की १९६५ च्या युद्धात भारतीय मुस्लिम सैनिकांनी भारताला साथ दिली नाही. पाकिस्तानला जगाला हे दाखवायचे होते की भारतीय मुस्लिम भारताशी निष्ठावान नाहीत. पण सत्य नेमके उलटे आहे.
१९४७ असो किंवा १९६५ पाकिस्तानला प्रत्येक वेळी ही अपेक्षा होती की भारतावर हल्ला झाला की भारतातील मुस्लिम त्यांच्याकडे वळतील. पण प्रत्येक वेळी भारतातील मुस्लिमांनी भारतालाच साथ दिली. महात्मा गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्यांनी सुद्धा शेख अब्दुल्ला यांनी सर्व धर्मीयांना एकत्र करून पाकिस्तानविरोधात उभारलेल्या फौजेचे समर्थन केले होते हा इतिहास आहे.
पाकिस्तानच्या आयएसपीआरने पसरवलेला हा खोटा प्रचार भारतातील गोदी मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने उचलला आणि देशभर पसरवला.
भारतीय लष्कराचे माजी मेजर जनरल सय्यद अता हुसैन स्पष्ट सांगतात २०१० मधील पाकिस्ताननिर्मित खोटे भारतात पसरवले गेले.
इतिहासातील वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश काळातसुद्धा भारतीय सैन्यात धर्मावर आधारित कोणतीही बटालियन नव्हती. बटालियनची रचना प्रदेश, जाती किंवा लष्करी गरजांवर आधारित होती धर्मावर कधीच नाही. म्हणजे कधीकाळी मुस्लिम रेजिमेंट होती हा दावा शंभर टक्के खोटा आहे. या दाव्याचा फॅक्ट-चेक टाइम्स ऑफ इंडिया, द वायर, इंडियन एक्सप्रेस, फ्रंटलाईन यांसारख्या प्रतिष्ठित माध्यमांनी केला आहे आणि हा दावा साफ फोल ठरवला आहे.

१९६५ च्या युद्धात पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या पॅटन टँक्सच्या जोरावर भारताला चिरडता येईल असा पाकिस्थानचा भ्रम होता. तो भ्रम शहीद सुभेदार अब्दुल हमीद यांनी रणांगणावर नेस्तनाबूत केला. त्यांच्या पराक्रमासाठी भारत सरकारने त्यांना मरणोपरांत परमवीर चक्र देऊन गौरवले. आणि तरीही आज निर्लज्जपणे असे सांगितले जाते की मुस्लिम सैनिकांनी १९६५ मध्ये पाकिस्तानला साथ दिली!
इतिहासाकडे पाहा एकाच कुटुंबात काका पाकिस्तानच्या सैन्यात, तर पुतण्या भारताच्या सैन्यात देशासाठी लढतो. हिंदूंप्रमाणेच मुसलमानांनीही रक्त सांडले, बलिदान दिले, आणि तिरंग्यासाठी प्राण अर्पण केले. गुगल उघडा. “India Muslim soldiers martyred” असे शोधा शेकडो नावे सापडतील. आणि तरीही हा नीच प्रचार सुरूच आहे की मुस्लिम सैनिकांनी शस्त्रे टाकली!
२०२० मध्ये भारतीय सैन्याचे १२० सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले.
त्या पत्रात स्पष्टपणे सांगितले गेले की मुस्लिम सैनिकांवर संशय घेणारा प्रचार देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. तो प्रचार सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त सैनिकांच्या प्रामाणिकपणावर थेट हल्ला करतो आणि सैन्याचे मनोबल खच्ची करतो.
अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी होती. पोस्ट हटवायला हव्या होत्या. गुन्हे दाखल व्हायला हवे होते. कारण या पोस्टचा थेट फायदा पाकिस्तानसारख्या शत्रूंना होतो. पण आजपर्यंत एकही ठोस कारवाई झालेली नाही हीच खरी शोकांतिका आहे.
म्हणून पुन्हा एकदा ठामपणे सांगतो १९६५ च्या युद्धात भारताच्या कोणत्याही मुस्लिम रेजिमेंटने आत्मसमर्पण केले नव्हते, कारण अशी कोणतीही मुस्लिम रेजिमेंट अस्तित्वातच नव्हती. हा सगळा खोटा प्रचार पाकिस्तानच्या आयएसपीआरचा आहे, आणि भारतात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती त्याला खतपाणी घालत आहेत. काश्मीर असो, कारगिल असो किंवा देशाचा कुठलाही कोपरा भारतीय मुस्लिमांनी भारतावरचे प्रेम कृतीतून दाखवले आहे.
म्हणूनच, जेव्हा जेव्हा असा खोटा, विषारी प्रचार समोर येईल, तेव्हा गप्प बसू नका. विरोध करा. सत्य मांडा़. कारण खोट्याविरोधात उभे राहणे हेच देशप्रेम आहे आणि भारतीय सैन्याच्या सन्मानाचे रक्षण आहे.

