नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळा ते वसंतराव नाईक पुतळा यादरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर, दातिवाला पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला आज काही वेळापूर्वी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या थैल्यामध्ये ठेवलेले एक मृत अवस्थेतील अर्भक आढळून आले. ही बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
या निष्पाप जीवाची माता कोण असेल, तिची अवस्था काय असेल आणि अशा टोकाच्या निर्णयामागे नेमकी कोणती परिस्थिती असेल, असे अनेक गंभीर प्रश्न समाजासमोर उभे राहिले आहेत. समाज कुठल्या दिशेने चालला आहे, मानवी संवेदना कुठे हरवत चालल्या आहेत, याचा विचार करण्यास ही घटना भाग पाडणारी आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. संबंधित अर्भकाची ओळख पटवणे, घटनेमागील कारणांचा शोध घेणे आणि दोषींवर कारवाई करणे ही जबाबदारी आता तपास यंत्रणांवर आहे.
ही घटना केवळ एक बातमी न राहता, समाजमन हादरवून टाकणारा वास्तवाचा आरसा ठरत असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर गंभीर चिंतनाची गरज अधोरेखित होत आहे.या प्रकरणी आता वैरिणी माते विरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे.

