हेडलाईन दिल्या, सत्य लपवले: पत्रकार परिषद की राजकीय नाट्य?
काल झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना जणू उद्याच्या हेडलाईन्सच वाटून टाकल्या. मात्र गंमत अशी की त्या “हेडलाईन्स” प्रत्यक्षात कुठल्याच वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या नाहीत. तरीही एक गोष्ट मात्र नक्की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आपल्याकडे मुद्दा काय आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले. कारण उरलेले मुद्दे आता फारसे उपयोगाचे राहिलेले नाहीत. महामार्ग झाले, समृद्धी महामार्ग झाला, शक्तीपीठ महामार्ग होणार आहे म्हणजे विकासाची यादी तयार आहे, वास्तवाची जबाबदारी मात्र अनाथ आहे.
शेतीसाठी सरकारकडे नेमके काय आहे, हे शेतकऱ्यांना माहीत नाही असे नाही; पण ते सांगण्याची गरज कुणाला वाटत नाही, हा खरा प्रश्न आहे. मनरेगाच्या जागी आलेली जीएमजी योजना नवीन कायद्यानुसार किती “फायद्याची” आहे, हे मात्र मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले गेले. पण या फायद्यांच्या कथेत एक महत्त्वाचा आकडा मात्र काळजीपूर्वक लपवण्यात आला मनरेगामध्ये ९० टक्के निधी केंद्र सरकार देत होते आणि १० टक्के राज्य. आता मात्र राज्य सरकारला ४० टक्के उचलावे लागणार आहेत आणि केंद्र ६० टक्के देणार आहे. म्हणजेच मनरेगा कायद्यामुळे राज्य सरकारवर पडणारा ४० टक्क्यांचा बोजा याबद्दल मात्र अशोक चव्हाण साहेबांना ना चिंता आहे, ना खंत. कारण पैशांचा खेळ सुरूच आहे, आणि पक्ष नवीन आहे. नवीन पक्षाची ध्येयधोरणे राबवणे ही त्यांची मजबुरी आहे पर्याय नाहीच.
एमजीएम मध्ये १२५ दिवसांचे काम सांगितले, हे खरे. पण सुगीच्या दिवसांत हे काम मिळणार नाही, हे मात्र सांगितले नाही. कारण त्या काळात मजुरांना जमीनदार सांगेल त्या दरावरच काम करावे लागते. जीएमजीचे काम त्या वेळी उपलब्ध असते, तर मजुरांनी आपल्या मजुरीचे दर वाढवले असते. हा साधा हिशोब सांगण्याकडे मुद्दाम काना-डोळा करण्यात आला. हे त्यांना समजत नाही असे नाही ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. खेळ माहीत आहेत, फक्त ते कसे लपवायचे, हेही त्यांना उत्तम जमतं. तो गुण कालच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दिसला.
पत्रकार परिषदेची सुरुवात विश्रामगृहाच्या सभागृहातून झाली. या सभागृहात इतक्या दिवसांनी पत्रकार परिषद का होत नव्हती, कोणी रोखली होती का हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. कारण विश्रामगृह आपलेच आहे, आपल्या काळातच उभे राहिले आहे. पाया कुठे गेला आणि इमारत कशी उभी राहिली, हे ऐकण्यासाठीच तर पत्रकार आलेले असतात. पण प्रत्येक प्रश्न किती समर्थपणे टोलवायचा, हे मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिकलेले धडे आजही तितकेच ताजे आहेत. पद गेले असेल, पण गुण अजून जिवंतच आहेत.
योजनेबद्दल बोलून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत “माझ्याकडे मुद्दा आहे” हे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे दाखवले. छान झाले. निवडणुकीच्या एक दिवस आधी पडलेल्या घरांबद्दल, तसेच बांधकामात झालेल्या दुर्लक्षाबद्दल मोठा निर्णय होईल, अशी अपेक्षा मात्र नांदेडकर जनतेची आहे. जीएमजी योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकल्याचा प्रश्न इतक्या “सुंदर” शब्दांत टोलवण्यात आला की पुढचा प्रश्न विचारायची गरजच कुणाला उरली नाही. महात्मा गांधी केंद्रातील सत्तेला नको आहेत, हे तसेही लपून राहिलेले नाही. मात्र “नवीन कायदा आहे, म्हणून नवीन नाव” हा खुलासा करून विषय अलगद बाजूला सारण्यात आला.
एमआयएमच्या सदस्यसंख्येबाबत बोलताना “मागेही एमआयएम आली होती” आणि “तेव्हा देखील बी-टीम म्हटले जायचे” असे सांगून अत्यंत चतुर उत्तर देण्यात आले. पण २०१२ मध्ये एमआयएमची संख्या वाढली तेव्हा आपण काय बोललात, हे जरी विसरले असाल अशोक चव्हाण साहेब, तरी जनता विसरलेली नाही. आज भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण कुठे जाणार, हेही जनतेला माहीत आहे.
“लोक माझ्या बद्दल खालच्या स्तरावर बोलले तर मला जास्त मते मिळतात” हा अनुभव सांगणारे तुम्हीच, पण “खा मटण कोणाचेही, बटन दाबा कमळाचे” हा प्रचार कोणाचा होता, हेही जनता विसरलेली नाही. शेवटी निवडणूक संपली आहे. ४५ सदस्य झाले आहेत, मागील संख्येच्या तुलनेत आपण पहा किती सदस्य निवडून आले आहेत. बहुमत तुमच्याकडे आहे, आणि आवडीचा महापौर होणारच हे लपून राहिलेले नाही.२२ तारखेला महापौरपदाचे आरक्षण जाहीर होईल. ४५ पैकी कोणाची लॉटरी लागते, हे ठरणार आहे. एकापेक्षा जास्त दावेदार असतील तर रस्सीखेच होईल हेही नांदेडकर पाहणारच आहेत.
“विरोधक जिंकले तर जनशक्ती, आम्ही जिंकलो तर धनशक्ती” हे उत्तर आपणा कडून दिले गेले. पण भाजप जनशक्तीवर निवडणूक लढवते, हा दावा आता फारसा विश्वासार्ह राहिलेला नाही. विधानसभेच्या निवडणुका, भोकर मतदारसंघ, आणि कुणाला किती पैसे दिले याची कागदपत्रे आजही जनतेकडे आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे ती दाखवायची कुणाला, आणि त्यावर विश्वास ठेवायचा कुणी? कारण सत्तेत तर तुम्हीच आहात. सत्ताधीशांविरुद्ध बोलणे आज देशद्रोह ठरते, हे आता जनतेलाही कळले आहे आम्हालाही.
तरीही अभिनंदन अशोक चव्हाण साहेब,आपल्या मर्जीतील महापौर होणार आहे यासाठी.
