नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे निवांतपणे अपहरण करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेण्यात आले. या अपहरणाचा सीसीटीव्ही पुरावा उपलब्ध असतानाही संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसते.
अपहरणादरम्यान घोगरे पाटील यांना अत्यंत बोचऱ्या आणि जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या. “साहेबांच्या नादी लागू नका, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात गेलात तर परिणाम वाईट होतील,” असे स्पष्ट सांगण्यात आले.सोबतच त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
इतका गंभीर प्रकार घडूनही नांदेड ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला ‘जीवघेण्या हल्ल्याचे’ कलम लावलेच नाही. कारण काय? कारण फिर्यादीत ‘हल्ला झाला’ हा शब्द नव्हता, असा केविलवाणा युक्तिवाद पुढे करण्यात आला. परिणामी गुन्हा क्रमांक 1217/2025 मध्ये केवळ IPC 118(2), 352(2), 323, 189(3) अशी तुलनेने सौम्य कलमे लावण्यात आली.
काही तासांत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक झाली खरी, पण मुख्य आरोपी म्हणून नाव घेतलेल्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांची नावे गुन्ह्यातून वगळली गेली. हा योगायोग की राजकीय दबाव?
यानंतर ६ जानेवारी २०२६ रोजी जीवन घोगरे पाटील यांनी संतोष पडवळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत संतोष वडवळे यांनीही थेट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर गंभीर आरोप केले. तरीही आश्चर्य म्हणजे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
याच पत्रकार परिषदेत घोगरे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते –
“मला नांदेड ग्रामीण पोलिसांवर विश्वास नाही. मी या प्रकरणात एसआयटी स्थापन करूनच सोडणार.”
आणि अखेर १३ जानेवारी २०२६ रोजी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचा आदेश जावक क्रमांक 4//एसआयटी/182/ दिनांक 13 जानेवारी 2026 प्रमाणे SIT ची स्थापना करण्यात आली आहे.
या आदेशानुसार गुन्हा क्रमांक 1217/2025 साठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
एसआयटीमधील अधिकारी:
- अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर – एसआयटी प्रमुख
- बाळासाहेब रोकडे, दुय्यम पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे
- सुनील बुलंगे, पोलीस उपनिरीक्षक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे
- गजानन कदम, पोलीस अंमलदार (बक्कल नं. 784), नांदेड शहर
- विठ्ठल शेळके, स्थानिक गुन्हे शाखा (बक्कल नं. 2432)
जीवन घोगरे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सातव्या दिवशी एसआयटी स्थापन झाली, हे खरे. पण प्रश्न कायम आहे—
एसआयटीत बसलेले अधिकारीही शेवटी पोलीसच आहेत.
ज्यांच्यावर विश्वास नाही, त्यांच्याच खात्याच्या चौकटीत तपास होणार!
याआधी वास्तव न्यूज लाईव्ह ने स्पष्ट शब्दांत लिहिले होते
“पोलीस खाते करील तेच होईल.”
आज एसआयटी स्थापन झाली असली तरी तपास खरोखर निष्पक्ष होणार की राजकीय दबावाखाली पुन्हा एकदा सत्य गाडले जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जनतेची नजर आता एसआयटीच्या तपासावर आहे. सत्य बाहेर येणार की सत्ता पुन्हा एकदा कायद्यावर मात करणार?
संबंधित बातमी ….
नांदेडचे वाल्मीक कराड आ.प्रताप पाटील चिखलीकर-जीवन घोगरे पाटील
