नांदेड:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्टी देखील रवाना झाल्या आहेत. उद्या गुरुवारी (१५ जानेवारी) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. नांदेड शहरात एकूण २० प्रभाग आहेत. ज्यात १९ प्रभाग हे ४ सदस्यीय तर एक प्रभाग ५ सदस्यीय आहे. नांदेडकरांना एकूण ८१ नगरसेवक निवडायचे आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, या करिता शहरात जवळपास ४ हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत तर ३ हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
नांदेड महानगरपालिकेत एकूण ५ लाख १ हजार ७९९ मतदार आहेत, ज्यात २ लाख ५४ हजार ९९९ पुरुष मतदार आहेत, तर २ लाख ४६ हजार ६९६ महिला मतदारांची संख्या आहे. शिवाय १०४ इतर मतदारांचा ही समावेश आहे. उद्या गुरुवारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील स्टाँग रुममधुन मतपेट्या व त्यासाठी लागणारे साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शहरात ६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मतदानादासाठी आवश्यक मतपेट्या, कंट्रोल युनिट इत्यादी साहित्य शासकीय तंत्रनिकेतन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम मधुन वितरीत करण्यात आले. याठिकानाहुन ६०० कंट्रोल युनिट, १६९६ बॅलट युनिट, शाई व मतदान प्रक्रियेसाठी लागणारे अन्य साहित्य, मतदान केंद्राध्यक्ष व निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वितरीत करुन कडक पोलीस बंदोबस्तात वाहनांव्दारे नियोजित मतदान केंद्रावर पोहचवण्यात आले आहे.
*मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील*
उद्या गुरुवारी दि.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी लागणारे सर्व नियोजन मतदान केंद्राच्या ठिकाणी करण्यात आले आहे. शहरात मतदानाचं प्रमाण वाढावं, तसेच महिला मतदारांचं प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.मतदान केंद्रांमध्ये मतदारांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा पुरविल्या जाणार आहेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात रॅम्प तयार करण्यात आले, तर दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन *पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले आहे.
