नांदेड – सौ. उषा नारायणराव गैनवाड या सुधारणावादी लेखिका असून समाजातील व विशेषतः महिलावर्गातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. याच समाजविकासाच्या ध्यासातून त्यांनी ‘सुधारणेच्या वाटेवर’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे असे प्रतिपादन समीक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले.
इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या व उषाताई गैनवाड लिखित ‘सुधारणेच्या वाटेवर’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नारायण शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. डॉ. एम. आर. जाधव, केशवराव कदम, डॉ. शिवानंद धामणे उपस्थित होते.
क्रतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. यानंतर डॉ. कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते ‘सुधारणेच्या वाटेवर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. लेखिका उषाताई गैनवाड यांनी आपल्या मनोगतातून आपण सावित्रीबाई फुले यांचा समाजसुधारणेचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगितले. तसेच पुस्तक निर्मितीबाबतचे आपले विचार व्यक्त केले. प्रा. एम. आर. जाधव आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, उषाताई गैनवाड यांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहत या पुस्तकाचे लेखन केले आहे. महापुरुषांविषयीही यात कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच आस्तिक किंवा नास्तिक यत न पडता लेखिकेने वास्तविकतेचा मार्ग निवडला आहे. महिलांना कर्मकांडातून बाहेर पडण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून त्यांनी केले आहे. यासाठी त्या कटिबद्धही
आहेत. त्यांची लेखनशैली संवादी आहे असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष प्रा. नारायण शिंदे यांनी म्हटले की, लेखिकेने वास्तव लिहिण्याचे धाडस केले आहे. त्यांचे लिखाण हे ‘अत्त दीप भव’ याप्रमाणे उजेडाचा मार्ग दाखविणारे आहे. अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी कृष्णा गैनवाड, नामदेव एडके, योगाचार्य सोनटक्के यांचीही भाषणे झाली.
विजयकुमार बेंबडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास निर्मलकुमार सूर्यवंशी, माधव चुकेवाड, आनंद पुपलवाड, पंडित पाटील, अशोक कुबडे, प्रा. महेश मोरे, दिगंबर कानोले, डी. एन. मोरे खैरकेकर, राजीव पुपलवाड आदी साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते
समाजाच्या प्रगतीच्या उद्देशाने ‘सुधारणेच्या वाटेवर’ ग्रंथाची निर्मिती;समीक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांचे प्रतिपादन
