नांदेड येथील “हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन

नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती महाराष्ट्र यांच्या वतीने  “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त दि.  24 व 25 जानेवारी 2026 रोजी  मोदी मैदान नांदेड  येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

महाराष्ट्र सदन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस शहीदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंघजी खालसा भिंडरावाले मुखी दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, नांदेड क्षेत्रीय आयोजन समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग,  राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक,  प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम समन्वयक श्री. जसवंत सिंग, माहिती संचालक हेमराज बागुल, निमंत्रक बल्क मलकीत सिंघ आदी उपस्थित होते.

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यामाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले आहे.

संत ज्ञानी बाबा हरनाम सिंघजी यांनी सांगितले की महाराष्ट्र  शासनाकडून संपूर्ण देशात “हिंद दी चादर” म्हणून पूजनीय असलेल्या श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षाचे (बलिदान वर्ष) स्मरण करण्यात येत आहे. स्वातंत्र्याची जपणूक, श्रद्धेचे स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण व मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे हे कालातीत प्रतीक आहे.

या ऐतिहासिक स्मरणोत्सवात आध्यात्मिक साधना, ऐतिहासिक जागृती, युवकांचा सहभाग तसेच सामाजिक एकात्मता यांचा समन्वय साधण्यात येत आहे. प्रथमच या उपक्रमाच्या माध्यमातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासी तसेच भगत नामदेव संप्रदाय अशा श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्याशी ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते असलेल्या समुदायांना एका व्यासपीठावर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. ३५० वर्षांनंतर या ऐतिहासिक नात्याचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

आध्यात्मिक प्रवचने, कीर्तन, ऐतिहासिक प्रदर्शन, शैक्षणिक सादरीकरणे तसेच समुदाय संवाद यांचा समावेश असून, श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे जीवन, कार्य, शिकवण व त्याग यांचे सखोल दर्शन घडविले जाणार आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येत असून, गुरुजींच्या शहिदीचे ऐतिहासिक महत्त्व व संविधानिक मूल्ये-धर्मस्वातंत्र्य, समानता व न्याय-यांच्याशी असलेले त्याचे नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

या कार्यक्रमातून गुरुजींच्या काळात बंजारा व लबाना समाजाने दिलेल्या सहकार्यावर प्रकाश टाकण्यात येत आहे. तसेच औरंगजेबाच्या राजवटीत अत्यंत धोकादायक परिस्थितीतही गुरुजींचे अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्यांनी दाखविलेल्या अपूर्व धैर्याचा गौरव करण्यात येत आहे. यासोबतच, श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे सोबत राहिलेल्या मोहयाल समाजातील भाई मती दास जी, भाई सती दास जी व भाई दयाला जी यांच्या सर्वोच्च बलिदानालाही मानवंदना देण्यात येत आहे. श्री गुरु नानक देव जी यांच्या परंपरेनुसार सिंधी समाज हा या उपक्रमाचा अविभाज्य भाग आहे. “गुरु नानक नाम लेवा संगत” या संकल्पनेखाली या शिकवणींवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना एका समान व्यासपीठावर आणण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे सेवा भावनेतून आयोजित करण्यात येणारा भव्य लंगर, जो गुरुजींच्या समानता, करुणा व निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांचे प्रतीक आहे. यामध्ये सर्व समुदायांचा संघटित स्वयंसेवक सहभाग असणार आहे. इतका समावेशक, शैक्षणिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असा उपक्रम प्रथमच केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.

नुकताच नागपूर येथे यापैकी एक भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.  विविध समाजांतील पाच लाखांहून अधिक नागरिकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरील व्यापक सहभाग असलेले भव्य सार्वजनिक समारंभ म्हणून नियोजित असून, सामाजिक सलोखा, आंतर-सामुदायिक समज आणि सामायिक वारशाच्या स्मरणाला चालना देण्याचा त्यामागील उद्देश आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड क्षेत्रीय आयोजन समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग,  यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त रेल्वे आणि विमान  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!