अलीकडे हार्मुजच्या खाडीमध्ये इराणने काही तेलवाहू जहाजे रोखून ठेवली होती. त्यानंतर काही भारतीय तेलवाहू जहाजे भारताकडे रवाना झाल्याची बातमी समोर आली आणि लगेचच विविध स्तरांवर त्याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागले. काही लोकांनी असा दावा केला की ही जहाजे त्यांच्या राजकीय प्रयत्नांमुळे किंवा दबावामुळे सोडण्यात आली. मात्र प्रत्यक्ष वास्तव यापेक्षा खूप वेगळे असल्याचे इराणमधील भारताचे राजदूत मोहम्मद फतेह अली यांनी स्पष्ट केले. राजदूत मोहम्मद फतेह अली यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, इराणमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांनंतर भारतातील सामान्य जनतेने इराणबद्दल जी सहानुभूती, संवेदना आणि मैत्रीची भावना व्यक्त केली, त्याचा इराणच्या लोकांवर खोल परिणाम झाला. काही निरपराध बालिकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर भारतातील अनेक लोकांनी सोशल मीडियावर, सार्वजनिक चर्चांमध्ये आणि विविध माध्यमांतून इराणच्या लोकांबद्दल आपला पाठिंबा व्यक्त केला. ही भावना केवळ औपचारिक नव्हती, तर ती खरी मानवी संवेदनांमधून आलेली होती. याच मानवतावादी भावनेमुळे आणि भारतीय जनतेने दाखवलेल्या आपुलकीमुळे इराणने काही भारतीय तेलवाहू टँकर्स हार्मुजच्या खाडीतून सोडण्याचा निर्णय घेतला. राजदूतांनी स्पष्टपणे नमूद केले की हा निर्णय केवळ भारत सरकारच्या विनंतीमुळे घेतलेला नाही, तर भारतातील जनतेने दाखवलेल्या सहवेदनेमुळे आणि मैत्रीच्या भावनेमुळे घेण्यात आला. एका सोशल मीडियावरील संदेशातही त्यांनी भारतातील जनतेचे मनापासून आभार मानले. त्यांनी लिहिले की, मी भारतातील प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे. भारताच्या जनतेने इराणबद्दल दाखवलेली सहानुभूती आणि पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. भारत आणि इराण यांच्यातील मैत्री ही केवळ सरकारांपुरती मर्यादित नसून ती दोन्ही देशांच्या लोकांमधील विश्वास, आदर आणि मानवी नात्यांवर आधारलेली आहे. इराणवर हल्ला झाल्यानंतर भारतातील काही मानवतावादी विचारांचे लोक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही पत्रकार थेट इराणच्या दूतावासात गेले होते. त्यांनी तेथे जाऊन इराणच्या लोकांबद्दल आपली सहवेदना व्यक्त केली आणि या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत असा दिलासा दिला. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील लोकसंबंध अधिक दृढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भारत सरकारच्या वतीनेही एक वरिष्ठ अधिकारी इराणच्या दूतावासात जाऊन संवेदना व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिले होते. मात्र त्यासाठी काहीसा वेळ लागला. या पार्श्वभूमीवर भारताच्या जनतेने दाखवलेली तत्परता आणि मानवी दृष्टिकोन अधिक ठळकपणे समोर आला. आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिले असता अनेक देश या संघर्षाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीत. काही विश्लेषकांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काही मोठी राष्ट्रे त्यांच्या स्वतःच्या राजकीय आणि सामरिक हितसंबंधांनुसार भूमिका घेत आहेत. परंतु या सर्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर काही खरोखर महत्त्वाचे ठरते, तर ते म्हणजे सामान्य लोकांमधील मानवता, सहानुभूती आणि परस्पर मैत्री. भारताच्या जनतेने दाखवलेली समजूतदारपणा, सहवेदना आणि मानवी मूल्यांवरील विश्वास यामुळे अनेक राजकीय गैरसमज दूर झाले. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली. सरकारे कधी कधी चुकू शकतात, राजकारणात मतभेद असू शकतात; पण लोकांमधील मैत्री, मानवता आणि संवेदना या गोष्टीच खऱ्या अर्थाने दोन देशांना जोडून ठेवतात. Kanthak Suryatal Post Views: 545 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती संभाजीनगर येथील भदंत ग्यानरक्षित थेरो यांची धम्मदेसना १९ रोजी ज्येष्ठ वकील अड़. अमरजीतसिंघ रामगडिया यांचे निधन