जि. प. शाळेत संयुक्त जयंती कार्यक्रम; ‘होय, मी जिजाऊ बोलतेय’ एकांकिका रंगली!
नांदेड- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जवळा दे. येथे अभिवादन व ‘होय, मी जिजाऊ बोलतेय’ एकांकिका कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने बालविवाहमुक्तीसाठी जनजागृती यावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रतिसाद मिळाला. बालविवाहमुक्तीवर आधारित प्रश्न विचारून विजेत्या विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, सरिता गच्चे, पांडुरंग गच्चे, मारोती चक्रधर, इंदिरा पांचाळ, संजय शिखरे, बाबासाहेब शिखरे, विकी गोडबोले, साहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात बालविवाहमुक्तीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत लेक शिकवा लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ढवळे जी. एस., बडवणे एस. आर., बेंबडे यु. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्तीसाठी जनजागृती प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. यात काही प्रश्न विचारण्यात आले. या उपक्रमास इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थींनींचा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे धूप व पुष्पपूजन संपन्न झाले. त्यानंतर प्रश्नमंजुषेतील विजेते मयुरी गोडबोले, तेजल शिखरे, अनन्या टिमके यांचा सत्कार करण्यात आला. प्रश्नमंजुषेनंतर ज्ञानेश्वरी शिखरे, शिवानी शिखरे आणि स्वरा शिखरे या विद्यार्थिंनीनी ‘होय, मी जिजाऊ बोलतेय!’ ही एकांकिका सादर केली. ग्रामपंचायत कार्यालयातही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम घेण्यात आला. प्रश्नमंजुषेचे परिक्षण संगिता बडवणे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन बेंबडे यांनी तर आभार सुप्रिया गच्चे हिने मानले.
अशी घेण्यात आली प्रश्नमंजुषा
बालविवाहमुक्तीसाठी जनजागृती प्रश्नमंजुषा या उपक्रमात बालविवाह म्हणजे काय? योग्य विवाहाचे वय कोणते? बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या साली झाला? बालविवाह का केले जातात? बालविवाहाचे कोणते दुष्परिणाम होतात? आरोपींना कोणती शिक्षा होते? बालविवाह होत असल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा? प्रथम कुणाला कळवावे? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी नेमकी उत्तरे दिली. तसेच प्रश्नांच्या उत्तरानुसार शिक्षकांकडून विशेष माहिती देण्यात आली.
