नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड महसूल प्रशासन आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी पिंपळगाव निमजी (ता. व जि. नांदेड) येथील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत सुमारे 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एक मोठी लोखंडी बोट, एक छोटी लोखंडी बोट, पाण्यात तरंगणारे तराफे आणि दहा ब्रास अवैध वाळूचा समावेश आहे. यातील तराफे व लोखंडी बोटी स्फोट घडवून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मंडळ अधिकारी मोहसीन ओसरानी, तलाठी माधव भिसे, रमेश गिरी, मनोज सरपे, मनोज जाधव, पोलीस उपनिरीक्षक कुशमे,पोलीस अंमलदार पंचलिंग, शेख समीर, शंकर माळगे आदी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मंगळवार, 7 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात तपासणी केली.
तपासणीदरम्यान पोलिसांना
- एक मोठी लोखंडी बोट (किंमत अंदाजे 15 लाख रुपये)
- एक छोटी लोखंडी बोट (6 लाख रुपये)
- पाण्यात तरंगणारे 12 तराफे (6 लाख रुपये)
- 10 ब्रास अवैध वाळू (50 हजार रुपये)
असा वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारा एकूण 27 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी कारवाईदरम्यान दोन लोखंडी बोटी आणि 12 तराफे जागीच नष्ट केले. या प्रकरणी शंकर व्यंकटी डख आणि चांदू व्यंकटी डख , दोन्ही राहणार पिंपळगाव निमजी, ता. व जि. नांदेड, यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार वसंत बालाजी केंद्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 16/2026 दाखल करण्यात आला आहे.अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही नांदेड ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आला आहे.
संबंधित व्हिडीओ ..
