नांदेड (प्रतिनिधी)- बिदर येथे झालेल्या किरकोळ भांडणाचे पडसाद थेट नांदेडमध्ये उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातूनच पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाकडून नांदेडमधील युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, गोळी युवकाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नांदेड शहरात प्रवाशांची मोठी गर्दी आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी नांदेड येथून काही प्रवासी स्थानिक प्रवासी गाड्यांनी (वाहनांनी) बिदरकडे गेले होते. प्रवासादरम्यान वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, काही प्रवाशांनी वाहनचालकांना मारहाण केल्याची माहिती आहे.
यानंतर ही वाहने पुन्हा नांदेडमध्ये परतल्यानंतर संबंधित वाहनचालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत पंजाबहून आलेल्या प्रवाशांच्या वाहनांचे टायर सोडल्याचा आरोप आहे. यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आणि वाचावाचीत परिस्थिती चिघळली. याच दरम्यान, पंजाबहून आलेल्या एका प्रवाशाने अचानक आपल्या जवळील बंदूक काढत गोळीबार केला.
या गोळीबारात कमलप्रीत सिंग नामक युवकाच्या पायाला गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. जखमी युवकावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला असून सध्या परिसरात शांतता आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराची घटना घडली हे वास्तव नाकारता येणार नाही.
विशेष बाब म्हणजे, प्रशासकीय स्तरावर गोळी लागलेल्या युवकाच्या नावाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तथापि, खासदार सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जखमी युवकाचे नाव आम्ही प्रसिद्ध करत आहोत.घटनेचा अधिक तपास सुरू असून, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे.
