आज आपल्या घरातील दिवटे आणि दिवट्या नेमके काय करत आहेत, कुठे जात आहेत, कोणासोबत वेळ घालवत आहेत, याचा गांभीर्याने शोध घेण्याची वेळ आली आहे. उद्या छातीत हात घालून रडण्यापेक्षा आजच प्रतिबंधात्मक आणि सुधारणात्मक पावले उचलली, तरच आपल्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. आपली मुले आणि मुली योग्य दिशेने जीवनाचा प्रवास करावेत, यासाठीच आम्ही आमच्या लेखणीला मेहनत देत आहोत.
येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. सिनेमा पाहणे हा काही गुन्हा आहे, असे आम्हाला मुळीच म्हणायचे नाही. मात्र पीव्हीआरसारख्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर बॅग ठेवण्यासाठी जी वेगळी जागा आहे, ती पाहिल्यावर अनेक प्रश्न उभे राहतात. कारण तेथे ठेवलेल्या बॅगा या कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवक-युवती वापरतात तशाच आहेत. याचा सरळ अर्थ असा की काही मुले-मुली कॉलेजला जाण्याचे सांगून प्रत्यक्षात चित्रपटगृहात वेळ घालवत आहेत.
जर चित्रपट पाहण्यामागे काही प्रेरणा, विचार किंवा सकारात्मक संदेश घेण्याचा उद्देश असेल, तर ते समजू शकते. परंतु पीव्हीआरमध्ये बहुतेक वेळा प्रेमकथांवर आधारित चित्रपटच दाखवले जातात, आणि अशाच चित्रपटांसाठी मोठी गर्दी होत असते, हे वास्तव नाकारता येणार नाही.
म्हणूनच पालकांनी हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे की आपला मुलगा किंवा मुलगी नेमकी किती वाजता कॉलेजला जाते, कधी परत येते, कोणते क्लासेस आहेत, ते किती वाजता सुरू होतात आणि कधी संपतात. या गोष्टींचा क्रॉस-चेक करणे ही संशयाची नाही, तर जबाबदारीची बाब आहे. नाहीतर उद्या धर्म, समाज किंवा परिस्थितीला दोष देत भांडणं उभी करण्यापेक्षा, आजच आपल्या मुला-मुलींना शिस्तबद्ध जीवन जगण्याचे धडे देणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
“मुलाला कॉलेजला पाठवले म्हणजे तो शिकतोय” हा गोड गैरसमज कृपया मनातून काढून टाका. कारण प्रत्येक जण कॉलेजमध्ये फक्त शिकायलाच जातो, असे नाही. पीव्हीआरमध्ये दिसलेला हा प्रकार आम्ही फोटोसह याच कारणासाठी प्रसिद्ध करत आहोत.
याच संदर्भात एक जुना प्रसंग वाचकांसमोर मांडू इच्छितो. आम्ही आमच्या मुलाला जेवणाचा डबा देण्यासाठी दररोज सकाळी दहा वाजता कॉलेजमध्ये जात असू. आमच्यासारखे अनेक पालक आपल्या मुला-मुलींचे डबे घेऊन एका ठरावीक ठिकाणी ठेवून परत जात. एकदा असेच परत येताना काही शिक्षक खाली चहा पीत उभे होते. त्यांनी आम्हालाही चहा घेण्याचा आग्रह केला. आमच्या हातात चहा येईपर्यंत दोन युवती कॉलेजच्या इमारतीत गेल्या आणि आमचा चहा संपण्याआधीच बाहेर परत आल्या.
ते पाहून एका शिक्षकांनी अत्यंत कडक शब्दात (जे शब्द आम्ही यात लिहू शकत नाही) विचारले, “कुठे चाललात?”त्यावर त्या म्हणाल्या, “काम आहे.”
शिक्षकांनी पुन्हा विचारले, “मग कॉलेज कशासाठी आलात? कामच करायचं होतं तर शिकायला कशाला?” त्या दिवशी आम्ही सलाम केला त्या शिक्षकांना.
त्या दहा मिनिटांत परत आल्याचा अर्थ स्पष्ट होता घरच्यांना सांगायचं की कॉलेजला गेलो, आणि कॉलेजमध्ये शिक्षकांना सांगायचं की काम आहे. अशा दुपट्टीपणाच्या धोरणावर आयुष्य उभं राहू शकत नाही. असे वागणे म्हणजे स्वतःचेच भविष्य उद्ध्वस्त करण्यासारखे आहे.
या बातमीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वाचकाला, प्रत्येक पालकाला कळकळीचे आवाहन करतो,आपली पालक म्हणून असलेली जबाबदारी पूर्णपणे ओळखा. आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, त्यांची तपासणी करा, त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. कारण आज दिलेले संस्कार आणि शिस्तच उद्या त्यांना योग्य उद्दिष्टापर्यंत पोहोचवू शकते.
