लेक वाचवा – लेक शिकवा अभियान: जवळा देशमुख येथील जि. प. शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम
नांदेड- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयातही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जि. प. शाळेत विद्यार्थिनींनी, अंगणवाडीत चिमुकल्यांनी तर ग्रामपंचायत कार्यालयात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, अंगणवाडी कार्यकर्ती इंदिरा पांचाळ, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे, आनंद गोडबोले, हरिदास पांचाळ, पांडुरंग गच्चे आदींची उपस्थिती होती.
भारतातील आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मयुरी गोडबोले, अनन्या टिमके, तेजल शिखरे आणि सोनल गोडबोले यांनी सावित्रीच्या लेकी बनून अभिवादन केले. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियानाबाबत मुख्याध्यापक ढवळे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता बडवणे यांनी तर आभार संतोष घटकार यांनी मानले.
