शेख रौफ शेख उस्मान दिले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचे नातेवाईक जावेद खाजामिया पठाण हे आंबेगाव, पुणे येथील गुरुदत्त वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होते. यावेळी जावेद पठाण यांची मैत्री संदीप भुरकेच्या बहिणी सोबत होती. जावेद पठाण आणि संदीप भुरकेच्या बहिणीमधील प्रेमसंबंधांमुळे संदीप भुरके याला राग आला होता. या रागातूनच त्याने आपल्या सोबत आणलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने जावेद पठाण यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात जावेद पठाण यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आंबेगाव (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2025 दाखल करण्यात आला. आरोपी मूळचे चिखलवाडी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक मोहन कलमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदेडमध्ये शोधमोहीम राबवली. मात्र सुरुवातीला आरोपी सापडले नाहीत.
पुढील तपासात आरोपी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे व पोलीस उपनिरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड आणि पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे,समीर अहेमद ,गवेंद्र सिरमलवार,शंकर माळगे यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संदीप रंगराव भुरके (वय 28) आणि ओमप्रकाश गणेश किरकन (वय 24) अशी आहेत. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील हे आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पुणे शहर येथील पोलीस उपनिरीक्षक मोहन कलमकर यांच्या स्वाधीन केले आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्याबाहेरून पळून आलेल्या गुन्हेगारांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
