कृषिसंवादाच्या अभ्यासातून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान
नांदेड(प्रतिनिधी)–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून सचिन नारायण खंडागळे यांना जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “सहयाद्री वाहिनीवरील कृषिसंवाद : एक विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर सखोल संशोधन करून ही पदवी प्राप्त केली.
या संशोधनातून कृषिविषयक माध्यमसंवादाची भूमिका, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याची प्रभावीता आणि प्रसारमाध्यमांचा सामाजिक-आर्थिक विकासातील सहभाग यांचा शास्त्रीय आढावा घेण्यात आला आहे. माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक व प्राध्यापक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी या संशोधनाचे मार्गदर्शन केले.
सचिन खंडागळे यांच्या या यशाबद्दल पूर्णा येथील विहाराचे भिक्खू पय्यावंश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. रवी सरोदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, सतीश वागरे, प्रा. गिरीश जोंधळे, नागराज मगरे, मनोहर सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रपरिवाराने अभिनंदन केले.
माध्यमे आणि शेती यांतील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार असून, जनसंवादाच्या क्षेत्रात सचिन खंडागळे यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
