नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे पोलीस विभागात नांदेडच्या रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 यास आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.शिंदे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपुर या रेल्वे गाडीत प्रवास करणारे प्रवासी गणेश राठी यांच्या पत्नीची बॅग चोरीला गेली. त्यामध्ये 14 लाख 100 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत पांचाळ यांनी अत्यंत जलदगतीने दखल घेतली. तेंव्हा कोल्हापुर-नागपुर ही गाडी पुर्णा रेल्वे स्थानकावर थांबली असतांना त्या ठिकाणी त्यांचाच पोलीस अक्षय मोरचुले बकल नंबर 441 हा रेल्वेमध्ये चोरी करण्यासाठी ख्यातनाम असलेल्या बाळू गणपत गव्हाणे सोबत रेल्वे स्थानकात गणवेश घालून फिरत होता. पोलीस अक्षय मोरचुलेेच चोर असलेल्या बाळू गव्हाणेसाठी वातानुकूलीत कक्षाचे दार उघडले हे दिसत होते. खरे तर अक्षय मोरचुलेची नोकरी धम्म परिषद नागपूर येथे लावण्यात आली होती. परंतू तो तेथे गेलाच नाही आणि इकडे चोराला मदत करत होता.
या प्रकरणातील चोर बाळू गणपत गव्हाणेला अटक करून रेल्वे पोलीसांनी चोरी गेलेल्या ऐवजातील 7 लाख 52 हजार 984 रुपयांचा ऐवज जप्त केला होता. या प्रकरणात चोरी करण्यातील सहकारी पोलीस अक्षय मोरचुले होता असे बाळू गव्हाणेने सांगितले होते. पोलीसांनी त्यालाही अटक केली परंतू न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली नाही. त्यानंतर तपासीक अंमलदाराने पोलीस कोठडी देण्याचा पुर्नविचार करावा असा अर्ज दिला. या प्रकरणात फिर्यादी गणेश राठी यांच्यावतीने सुध्दा ऍड. डी.के.हंडे यांनी काम केले आणि अखेर न्यायालयाने त्याचा दिलेला जामीन रद्द केला. त्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात अपील सादर केले. पण जिल्हा न्यायालयाने सुध्दा ते अपील फेटाळले.
7 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या चोरी प्रकरणातील पोलीस आरोपी काल दि.16 डिसेंबर रोजी रेल्वे पोलीसांनी पकडला. आज पोलीस निरिक्षक प्रकाश वाघमारे यांनी पोलीस अक्षय जितेंद्र मोरचुले यास न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. दयानंद गिते यांनी पोलीस कोठडी देणे का आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. कारण या प्रकरणातील जवळपास 7 लाख रुपयांचा चोरी गेलेला ऐवज अजून जप्त होणे आहे. न्यायाधीश आर.पी.शिंदे यांनी रेल्वे पोलीस अक्षय मोरचुलेला दोन दिवस अर्थात 19 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी…
चोरीचा आरोप असलेल्या रेल्वे पोलीसाने जामीन रद्द झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मागतोय

One thought on “14 लाखांच्या चोरी प्रकरणात रेल्वे पोलीसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी”