150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सऍप चॅटबॉट कार्यान्वित

व्हॉट्सऍप  चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध

नागरिकांनी व्हॉट्सऍप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉट्सऍप  चॅटबॉट प्रणालीची सुरुवात केली आहे. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. तरी या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्वसमावेशक माहिती नागरिकांना सहज मिळावी यादृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. यासाठी क्युआर कोड स्कॅन करा किंवा 8668223326 या क्रमांकावर व्हॉटसअप संदेश पाठवा आणि जिल्हाधिकारी  नांदेड यांच्या माहिती, तक्रारी, योजना व संदर्भातील व्हॉटसअप सुविधांचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सऍप  चॅटबॉटच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबद्दलची परिपूर्ण माहिती, अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील, विविध विभाग व शासकीय योजनांची माहिती, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक सेवा, तक्रार निवारणासाठी आवश्यक दुवे व माहिती.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त दोन क्लिकमध्ये आवश्यक माहिती मिळावी, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड व्हॉट्सअॅप चॅटबॉटमध्ये खालील सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरी सेवा, वरिष्ठ अधिकारी व विभागनिहाय संपर्क, जिल्हाधिकारी शाखांची माहिती, शासकीय योजना व आरटीएस सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, तक्रार निवारण प्रणाली, जमीन व महसूल इ. सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

नागरिकांना आवश्यक सुविधा सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!