रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित;पाण्यासाठी मागणी अर्ज करण्याचे आवाहन 

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत  

नांदेड – शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात बुधवार 10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकित होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोंबर 2025 रोजीच्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील (80.79 दलघमी) 100 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन रब्बी हंगामात दोन (2) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे.

प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारकांना अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व कालवा उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील उभी पिके व चारा पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7-7अ मध्ये भरुन सोबत थकीत पाणीपट्टी व चालू हंगामाची अग्रीम रक्कम भरण्यात यावी तरच पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल अन्यथा पाणी अर्ज नामंजूर झालेल्या अर्जदारांना पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. बुधवार 10 डिसेंबर 2025 पुर्वी संबधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात येईल.

रब्बी हंगाम सन 2025-26 मधील पाणीपाळीच्या प्रस्तावित कार्यक्रम

आवर्तन क्र. 1 दि. 15 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत कालावधी 30 दिवस आहे. तर आवर्तन क्र. 2 दि. 25 जानेवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 कालावधी 30 दिवस पर्यंत राहील.  पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो.

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे पंप व उध्दरण नलिका यांना बसवून 35 वर्षाचा कालावधी झालेला असून त्यांचे आर्युमान संपलेले आहे. त्यामुळे चालू पाणी पाळीमध्ये पंप व उद्धरण नलिकाच्या खराब स्थितीमुळे व्यत्यय आल्यास पाणीपाळी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यक्षेत्रातील शेतक-यांनी ही बाब विचारत घेऊनच पिक पेरणी करावी.नमुना नं. 7,7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जात खालील अटी व शर्तीचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल.

रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात दि.10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत. लाभधारकांना त्याच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.

काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976,कालवे नियम 1934,म.सिं.प.शे.व्य.कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

शासन निर्णयाप्रमाणे विहीत दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा केल्यास अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपुर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबधित लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर)चे उपकार्यकारी अभियंता बी.जे.परदेशी  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!