आंबेडकरी चळवळ विविधांगी आहे. ती राजकीय, साहित्य, जलसे, आंदोलनांच्या माध्यमातून मार्गोत्क्रमण करीत असते. धम्मक्रांतीनंतर आंबेडकरी चळवळ ही धम्मचळवळ झालेली आहे, अशी व्याख्या होत असली तरी आज आंबेडकरी चळवळ आणि धम्मचळवळ समांतर चालवावी लागत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात सहा डिसेंबर म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ही अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे. हा विषय केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. हे हरेक कार्यकर्त्याने लक्षात घेणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस म्हणजे जबाबदारीची जाणीव आहे. जयंतीच्या मिरवणुकीत नाचगाणे करणे म्हणजे जयंती साजरी झाली असे अनेक युवक युवतींना वाटते. त्यामुळे समाजात जे प्रदुषण पसरलेले आहे, ते आपण पाहतोच आहोत. आजपर्यंतच्या आंबेडकरी राजकीय नेतृत्वांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. प्रश्न काही संपलेले नाहीत. त्यांना जनतेची साथ किती मिळते, ही संशोधनाचीच बाब आहे. राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर प्रदुषण पसरलेले आहे. त्यामुळे हे निळे आकाश अधिकच काळवंडत चालले आहे. आपल्या जगण्यातील आपले वर्तन चळवळीची दिशा ठरवित असते. कितीही मोठा विचारवंत असला तरी तो कसा वागतो यावर त्याची वैचारिक पातळी दिसून येते. तद्वतच कार्यकर्ता स्वार्थाने बरबटलेला असेल तर समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जातो हे स्पष्टपणे दिसून येते. योग्य नेतृत्व समाजातून निर्माण झाले नाही की कार्यकर्ते सैरभैर होतात. कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला जाऊन बसतात. त्यांचेच झेंडे नाचवत असतात. यामुळे सामाजिक दुही निर्माण होते. आंबेडकरी साहित्य चळवळीत अनेक कळप निर्माण झालेले आहेत. धम्म चळवळीस पोषक असे साहित्य निर्माण झाले पाहिजे असे काहींचे मत आहे, तर बरेचसे साहित्यिक प्रस्थापितांना खुश करण्यासाठी लिहितात. जलशांनी तळागाळापर्यंत आंबेडकरी विचार नेला पण आजच्या सुपारीबाज जलसेकारांनी या चळवळीचा दिशाच बदलून टाकली आहे, हे लक्षात येते.
आंबेडकरी पत्रकारिता हेही एक चळवळीचे मोठे हत्यार आहे. बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे चळवळीला वृत्तपत्र नसेल तर तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षासारखी होते. आज विविध वृत्तपत्रांत काम करणाऱ्या आंबेडकरी पत्रकारांची वाणवा नाही. त्यांना अनेक मर्यादा आहेत आणि जे स्वतंत्र आहेत त्यांची वाताहत सुरू आहे अशी असणारी परिस्थिती आहे. अगदी कालचेच उदाहरण घेता येईल. नांदेड सक्षम ताटे या बौद्ध तरुणाचा खून झाला. या घटनेच्या बातम्या विविध वृत्तपत्रांनी आपापल्या पद्धतीने प्रकाशित केल्या. हरेक वृत्तपत्राला आपली स्वतःची एक भाषा असते. परंतु ज्यांनी या घटनेतील जातीवाद अधोरेखित केला, तो इथे महत्त्वाचा आहे. वंचितच्या अंजली आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर अनेकांनी जातवर्चस्ववाद या शब्दाला वगळले. वास्तविक जात आणि त्या अनुषंगाने येणारे जातवर्चस्ववाद हे आजचेही वास्तव आहे. संबंधित प्रकरणाला जातीय वळण लागू नये आणि ते पुढे चिघळू नये म्हणून वृत्तपत्रांनी काही एक भूमिका घेणे आवश्यक असते. परंतु तेच जर सत्य असेल तर यामुळे खरे बाजूला पडण्याची शक्यता अधिक असते. तात्पर्य हे की आजच्या आंबेडकरी युवकांना फार जबाबदारीने वागावे लागेल अशी आजची परिस्थिती आहे. अक्षय भालेरावचे प्रकरण अजूनही लोक विसरलेले नाहीत. शितल मोरेला, नितीन आगेला न्याय मिळालेला नाही. थोडे भूतकाळात गेलो तर खैरलांजीचे प्रकरण लख्खकन डोळ्यासमोर येते. अनेक तरुण हे प्रस्थापित समाजव्यवस्थेला बळी पडलेले आहेत आणि विस्मृतीत आहेत. प्रगतीच्या बाबतीत आम्ही निळ्या आभाळकडे झेपावलो असलो तरी आंबेडकरी समाजाला अन्याय अत्याचाराला नेहमीच तोंड द्यावे लागत आहे. कार्यकर्ता म्हणून उभे राहत असताना कोणत्याही राजकीय पक्षात असणारा कार्यकर्ता हा सर्वसाधारणपणे स्वाभिमान गहाण ठेवून राहतो. निवडणूकीच्या काळात आंबेडकरी म्हणजेच पर्यायी धम्मभूमिका बाजूला ठेवावी लागते.
आंबेडकरी कार्यकर्ता हा बहुआयामी असला तरी त्याला विचारवंताचे मार्गदर्शन आवश्यक असते. रस्त्यावरच्या चळवळी योग्य दिशेने जायला हव्यात यासाठीही ते आवश्यक असते. आंबेडकरी चळवळीत युवकांना मार्गदर्शन करणारे विचारवंत किंवा साहित्यिक हे मूळात स्वतंत्र विचारांचे असले पाहिजेत. ते प्रसिद्धीलोलुप किंवा पुरस्कारलोलुप असू नयेत. ते व्यवस्थेचा वापर करून घेण्याच्या नादात व्यवस्थेच्या दहशतीला शरण गेलेले असतात. त्यांच्या प्रतिभा गुलामच असतात. अशा प्रतिभा पारतंत्र्याच्या, लाचारिच्या आणि शोषणसत्ताक मानसिकतेच्या शब्दांची जुळवाजुळव करीत असतात. आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंतांचा शब्द नि आशय हा निर्भीड असायला हवा. तो कोणत्याही वर्चस्ववादी सत्तेपुढे झुकणारा नसावा. त्यांचे मार्गदर्शन कधीही किंवा कोणत्याही परिस्थितीत अन्यायाचे, विषमतेचे, असत्याचे आणि शोषणप्रवृत्तीचे अंशतःही समर्थन करणारे नसावे. असे असले तरी काहींच्या बाबतीत ही एक अपेक्षाच ठरते. अत्यंत नाजूक परिसरातही अनेक साहित्यिक विचारवंत हे मूग गिळून गप्प बसतात. हे फार भयंकर असते. येणारी पिढी ही मोठ्यांचे अनुकरण करीत असते. त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मात्र आजच्या घडीला असणारी व्यसनाधीनता हा मोठाच गंभीर प्रश्न बनला आहे. युवकांची व्यसनाधीनता हे आंबेडकरी समाजापुढे असलेले मोठे आव्हान आहे. गल्लीबोळातील कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमापासून ते भीम जयंतीच्या भव्य मिरवणूकीपर्यंत हे अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे. हे आंबेडकरी विचारधारेला घातक आहे. रस्त्यावरच उभे राहून मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये हे प्रकर्षाने दिसून येतात. धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या समुहात आंबेडकरी युवक अधिक आढळतात. अनेक प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या घेण्यात आंबेडकरी युवकांची आघाडी ही चिंताजनक बाब आहे. या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात येणारा सहा डिसेंबर हा केवळ चैत्यभूमीचे वंदन घेऊन येत नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव घेऊन येत आहे.
आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आयुष्यात येणारी भीम जयंती, बुद्ध जयंती, भीमा कोरेगाव, धम्मचक्र प्रवर्तन दिन वगैरे हे महत्त्वाचेच असतात. परंतु बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस हा संकल्पदिवस आहे. तो राजकीय कार्यकर्त्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. सगळे तत्त्वज्ञान झाकून ठेवून आपले अस्तित्व आणि स्वाभिमान गहाण ठेवण्याची वेळ आली तरी स्विकारावी लागते. ही त्याची मर्यादाच आहे. धम्मविचाराला तिलांजली देऊन सर्वधर्मसमभावाचा समरसतावाद हातात घेऊन गल्लोगल्ली उभे रहावे लागते. कोणत्याही राजकीय पक्षाची ध्येय धोरण आणि विचारधारा आपली मानावी लागते. सण, उत्सवासह सांस्कृतिक भूमिका बदलाव्या लागतात. निवडणुकीच्या काळात कोणत्याही थराला जावे लागते. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही सामाजिक समरसतेचा बुरखा तोंडावर घेऊन बाहेर पडावे लागते. हे रस्त्यावरच्या चौकाचौकात लगडलेल्या भव्य दिव्य बॅनरवरुन लक्षात येते. अशा कार्यकर्त्यांच्या अनेक कृतींत बदल घडून येतो. त्याचे अख्खे कुटुंब आणि मित्र परिवारही बदलून जातो. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशाप्रकारे सामाजिक कार्यकर्तेही बनत असतात. विविध धार्मिक सणांना उपस्थित राहून योगदान देत असतात. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टी काळात पूरग्रस्तांना मदत केली. त्याची चमकोगीरीही केली. निवडणूक होणार असल्याचे कळताच असे सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावर उगवले. मात्र सच्चे प्रामाणिक कार्यकर्ते मावळत जातात. तेही होत आहे. या काळातील सण, उत्सव हे तर पर्वणीच असतात. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशात बरेच काही सामावलेले असते. विविध प्रकारच्या वस्तू तथा भेटवस्तूंचे वाटप केले जाते. ते त्यांच्यासाठी फलदायी असते असे वाटते. दिवाळीसारखा सण तर त्यांच्यासाठी मोठी आनंदपर्वणीच! या काळात इच्छुक उमेदवारांकडून दिवाळी साहित्य, फराळ, भेटीगाठी, शुभेच्छा कार्डांचे वाटप केले जातात. स्थानिक ते राष्ट्रीय नेत्यांचे मोठमोठे बॅनर लावले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवून लोकसंपर्क वाढविला जातो. सोशल मीडियावरील सक्रियता डोळेभरुन पावते. हे सर्व काही अगदी डोळ्यासमोर घडले.
आंबेडकरी समाजातील अनेक होतकरू, अभ्यासू युवक युवती चळवळीपासून लांबच असतात. त्यांच्या आयुष्यात सहा डिसेंबर येत नाही असे नाही. त्यांचा अभ्यासही असतो. परंतु या चळवळीच्या निष्ठा निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. बुद्धिवंतांची चळवळीला फार मोठी गरज आहे. समाजाला आपण काही देणे लागतो, ही भावना निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. परंतु या चळवळीत उतरण्यासाठी अर्धे अधिक आयुष्य निघून जाते. असे कार्यकर्ते सेवानिवृत्तीनंतर सक्रिय होतात. धम्म चळवळीत योगदान देत राहतात. ऐन उमेदीच्या काळात त्यांना काही सूचत नाही. नोकरपेशा वर्गातील लोकांना आंबेडकरी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत काम करता येत नाही, असे नाही. करता येते. राजकीय कार्यकर्त्याचे बोट धरून चालता येत नसले तरी हितसंबंध ठेवता येतात. खाजगी सेवांमधील कर्मचारी तर उघड राजकारण करीत असतात. याला असलेली आर्थिक पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना ते शक्यही होत नाही. कार्यकर्ता म्हणून कोणत्याही टप्प्यावर पुढे आलो तरी राजकारण ही अत्यंत दुष्कर बाब आहे, अशी समजूत अनेकांची झालेली आहे. आपला हा काही प्रांत नाही, आपल्याला हे काही जमणार नाही ही भावना निर्माण होते. म्हणूनच मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा मिळविलेले अधिकारीही राजकारणापासून लांबच राहतात. सेवानिवृत्तीनंतर तरी आपले काही योगदान असावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मग पुढे या लोकांत आवड असलीच तर त्यांच्यातील कार्यकर्तेपण उशिरा जागवते. हे उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी त्यांनी आधी पोटाचा प्रश्न सोडवलेला असतो. बाबासाहेब म्हणतात की, अगोदर शिक्षण घ्या, मग पोटाचा प्रश्न सोडवा, मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता लाचार बनतो. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे असते. असे असतानाही काही जणांना खूप घाई झालेली असते. पुढे ते फार काळ टिकत नाहीत. आंबेडकरी विचारातच यशस्वितेच्या सर्व पायऱ्या आहेत हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त समजून घेण्यासाठी असलेला दिवस आहे.
युवतींच्या बाबतीतही सर्व काही आलबेल आहे असे नाही. अभ्यासू मुली वगळल्या तर बाकींच्यासमोर संसार सुखाचा हेच ध्येय असते. शासन प्रशासनात असलेल्या मुली किंवा स्रिया ह्या आपले कर्तव्य आणि आपले कुटुंब यांनाच प्राधान्य देतात. चळवळीचे बोट धरून राहणाऱ्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या असतील. महिलांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु ते सोडवतच आपल्या आयुष्यात येणारा सहा डिसेंबर आपल्याला काय सांगतो याचे चिंतन आवश्यक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये महिलांसाठी अनेक चळवळी झाल्या. त्यांचे अधिकार, हक्क, आरोग्य, आर्थिक परिस्थिती, मिळणाऱ्या सुविधा याबाबत प्रामुख्याने लक्ष वेधण्यात आले होते. शहरांबरोबरच गाव पातळीवरही महिला पुढे सरसावल्या आहेत. कारण त्या पुरुषांपेक्षा काही कमी नाहीत ही भावना जोर धरू लागली आहे. महिला आत्मविश्वासाने बोलताहेत, काहीतरी करून दाखवण्याची महिलांमधील जिद्द वाढली आहे. स्त्रीच्या राजकारणातील सहभागाविषयीच्या वाढणाऱ्या प्रतिकूलतेला स्त्रियांनी एक शक्ती बनवण्यात यश मिळवले आहे. स्त्रियांनी राजकारणाविषयी नकारात्मकता न बाळगता, राजकारणात आलं पाहिजे. महिला चळवळीने कात टाकून केवळ समाजकारणच न करता राजकीय आरक्षणासाठीही लढले पाहिजे आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समाजभान असलेल्या चांगल्या महिला राजकारणात सहभागी झाल्या पाहिजेत. महिला राजकीय क्षेत्रात सक्रीय होताहेत हे अत्यंत महत्त्वाचे असुन त्यातून येणारा काळ नक्कीच बदललेला असेल. राजकारणात येऊनही चांगलं समाजकारण करता येतं. महिला राजकीय आरक्षणासाठी लढता येऊ शकतं. परंतु ग्रामपंचायत सदस्य पदापासून पुढे सगळीकडे नवरेच कारभारी असतात, हे चित्र बदलायला हवं. आंबेडकरी समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर धम्मचळवळीत सक्रीय आहेत. मात्र, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासह युवा वर्ग आणि महिला कार्यकर्ता म्हणून पुढे आल्या पाहिजेत. त्यांनी इतर सर्वसामान्य महिलांचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. एखाद्या देशाने किती प्रगती केली याचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती. हाच संदेश आपल्याला आपल्या आयुष्यात येणारा सहा डिसेंबर देतो आहे.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.
