नांदेड(प्रतिनिधी)-36 के.बी.वायरला स्पर्ध झाल्यामुळे एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वसरणी भागात घडली आहे. विशेष महावितरण कंपनीने ही 36 के.व्ही.ची उच्च विद्युत प्रवाह वाहिनी फक्त 8 ते 10 फुट उंचीवर लावल्याने हा अपघात घडला आहे. या कुटूंबातील एक युवक अगोदरच अपघातात मरण पावला होता.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार जुन्या नांदेड भागात राहणारे मिठूलाल मंडले हे नावघाट जवळील बुरूड गल्लीत राहणारे आहेत. आज त्यांचा पुत्र रोहित मिठूलाल मंडले(23) हा वसरणी येथील एका शेतात काम करत असतांना त्याच्या हातातील वस्तु काही कारणाने उंच झाली आणि ती वस्तु 36 के.व्ही.च्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाली. तिव्र गतीचा विद्युत प्रवाह त्यातून वाहत असल्याने रोहितचा मृत्यू जागीच झाला.
मंडले कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोहितची पत्नी सध्या गरोदर आहे. यापुर्वी रोहितचा एक मोठा भाऊ अपघातात मरण पावला होता. त्यामुळे आता त्यांच्या घरात एकही कमावता पुरूष शिल्लक राहिला नाही. वृध्द आई-वडील आणि गरोदर पत्नी असा परिवार शिल्लक राहिला आहे. महावितरण कंपनीच्या या गलथानपणामुळेच रोहितचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने त्याच्या कुटूंबियांना मदत द्यावी असे स्थानिक नागरीक सांगत होते. 8 ते 10 फुटावर उच्च विद्युत वाहिनी तार लावल्या जाऊ शकतात काय? हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. पण दाद कोणाकडे मागावी हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
उच्च विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने युवकाचा मृत्यू
