नांदेड(प्रतिनिधी)-27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या 22 वर्षीय युवकाचा खून झाला. त्या प्रकरणी एक महिला आणि एक अल्पवयीन बालक अशा सहा लोकांना अटक केली होती. त्यातील चार जण उद्या 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलीसांनी काल रात्री सातवा आरोपी अटक केला आहे. त्यास विशेष न्यायाधिश आर.एम.शिंदे यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
27 नोव्हेंबर रोजी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिलिंदनगर भागात काही युवकांनी सक्षम गौतम ताटे या 22 वर्षीय युवकाचा गोळ्या मारून खून केला. या खूना मागे प्रेम आणि जातीयवाद असा त्रिकोण पण होता. कारण मरणाला सक्षम ताटे हा युवक अनुसूचित जातीचा आहे आणि त्यासोबत प्रेम करणारी मुलगी आँचल ही दुसऱ्या समाजाची आहे. म्हणून त्यांचा विवाह कधी करणार, कधी नाही करणार अशा अवस्थेत असतांना हा वाद वाढत गेला. अगोदर आँचलचे भाऊ आणि सक्षम यांचे मित्रत्व होते. पण एकदा कोणत्याही गोष्टीत विकोप आला तर त्याचा परिणाम भयंकरच होत असतो. परंतू एखाद्याचा खून करणे हा त्याचा पर्याय असू शकत नाही आणि त्यातल्या त्यात जातीच्या नावावर असा खून घडणे म्हणजे भारतीय संविधानाला नाकारण्यासारखे आहे. कारण ज्या दिवशी भारतीय संविधान स्विकारले गेले त्याच दिवसापासून भारतातील जातीय व्यवस्था समाप्त झाली होती. परंतू आज भारताच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पुर्ण झाली असतांना सुध्दा जात हा विषय मिटला नाही याची अनंत उदाहरण आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे सक्षम ताटेचा खून.
27 नोव्हेंबर रोजी खून झाला आणि त्वरीत प्रभावाने इतवारा पोलीसांनी आँचलची आई जयश्री मदनसिंह ठाकूर उर्फ मामीलवाड, आँचलचे वडील गजानन बालाजी मामीलवाड, साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ मामीलवाड, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुदळेकर यांच्यासह आँचलचा अल्पवयीन भाऊ अशा सहा जणांना अटक केली. अल्पवयीन बालकाला बाल न्याय मंडळाकडे पाठविण्यात आले. पुढे या बालकाला वयस्क श्रेणीत मोजावे असा अर्ज बाल मंडळाकडे करणार आहेत. बाल मंडळाचा निर्णय झाल्यानंतर या अल्पवयीन बालकाची रवानगी सुध्दा वयस्क या सदरात होईल. इतर पाच जणांना न्यायालयाने 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर अशी पोलीस कोठडी दिली. त्यानंतर न्यायालयाने महिला वगळता इतर चार जणांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली.
काल रात्री पोलीसांनी या प्रकरणातील सातवा आरोपी अमन देविदास शिरसे (22) रा.माळटेकडी नांदेड यास अटक केली. आज पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, सरबजितसिंघ पुसरी, सुनिल पेठशिवणीकर, पवार आणि बालाजी लामतुरे यांनी पकडलेल्या अमन शिरसेला न्यायालयासमक्ष हजर केले. सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी न्यायालयासमक्ष या प्रकरणात पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे. याचे सविस्तर सादरीकरण केले. आरोपी शिरसेच्या वतीने ऍड.जयपाल ढवळे यांनी बाजू मांडली.युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी अमन शिरसेला तीन दिवस अर्थात 5 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
सक्षम ताटे प्रकरण : ‘जातीयवाद संपला’ म्हणणाऱ्यांना चपराक; न्यायालयाने चार आरोपींची कोठडी वाढवली
