महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य ला नांदेडकरांची वाढती गर्दी
नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२५–२६ च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर सरस्वती प्रतिष्ठान, नांदेड च्या वतीने ‘ब्रह्मद्वंद्व’ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नादेड येथे सायंकाळी सात वाजता झालेल्या या प्रयोगाला नाट्य रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
एकाच व्यवसायातील दोन पिढ्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीतील द्वंद्व राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ब्रह्मद्वंद्व या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक महेश घुंगरे यांनी प्रभावीपणे मांडले. ब्राम्हण या जातीला केंद्र स्थानी ठेऊन एका प्रेमकथेद्वारे दोन पिढ्यांमधील द्वंद्व रंगवतांना लेखकाने जातीय, सामाजिक, व्यावहारिक व सध्या स्थितीतील समस्यांवर प्रकाश टाकला. मूलतः अंत्यंत्य प्रभावी असलेले कथानक, मुख्य अभिनयात असलेले महादेव शास्त्री (सुहास देशपांडे), सुद्धा ताई (स्वाती देशपांडे), नानासाहेब धर्माधिकारी (डॉ.उमेश भालेराव), माधवा (अक्षय भाले), सुदर्शन (डॉ.प्रसाद कुलकर्णी),स्नेहा (माधुरी लोकरे) यांच्या टोकदार संवाद व लिखाणात असलेली गती हे नाटकाचे वैशिष्ठ ठरले.

कलाकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भारावून गेले होते. दमदार अभिनय, कथेला आवश्यक तेवढे नैपथ्य आणि योग्य ते आवश्यक तेवढेच संगीत यांमुळे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. याशिवाय लहान माधवा यांच्या भूमिकेत असलेली आनंदी कुलकर्णी, ब्राम्हण शशिकांत कुलकर्णी, कुरियर वाला यश लोकरे, गोपाळ गुरु विश्वास चांदवसकर यांच्या भूमिकाही कथेला अनुरूप आणि प्रभावी होत्या.या नाटकाला यशस्वीरीत्या सादर करण्यासाठी संगीत (श्रीरमन देशमुख), प्रकाश योजना (रमेश पतंगे), रंगभूषा आणि वेशभूषा (अर्चना जिरवनकर), नैपथ्य (सुषेण पाटील अँड सत्यम स्वामी) या सर्व टीमने रंगमंचाबाहेर परिश्रम घेतले.

नांदेड मध्ये सुरु असलेल्या या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून केवळ नाममात्र रु १५ व १० मध्ये तिकीट दर असलेल्या व २७ नोव्हेंबर पर्यंत रोज सायंकाळी ठीक ७ वा. चालू राहणाऱ्या या नाट्य स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून महाराष्ट्राच्या समृद्ध अश्या नाट्य संस्कृतीचा आनंद घ्यावा असे आव्हान सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
