नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह शैक्षणिक व संशोधनात्मक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार संपन्न झाला आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे हे अभिनव एकत्रीकरण दोन्ही संस्थांच्या विद्यार्थी, संशोधक आणि अध्यापकवर्गासाठी नव्या संधींचे दार उघडणारे ठरणार आहे.
या कराराचा प्रमुख उद्देश शैक्षणिक बहुविधता, व्यावहारिक आरोग्यसेवा आणि तांत्रिक प्रगतीला गती देणे हा आहे. करारांतर्गत खालील प्रमुख क्षेत्रांत सहकार्य होणार आहे:
दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक संबंध व शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करणे
संयुक्त ऑनलाइन इ-सामग्री आणि अभ्यास साहित्य विकसित करणे
विद्यार्थ्यांसाठी ऑन-दी-जॉब ट्रेनिंग (OJT), अप्रेंटिसशिप व इंटर्नशिप संधी उपलब्ध करणे
समान विषयक्षेत्रातील अभ्यासक्रम विकासाला चालना
परिसंवाद, कार्यशाळा आणि शैक्षणिक बैठकांमध्ये संयुक्त सहभाग
विविध विषयांवरील संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे
अभ्यासक्रमामध्ये बहुविषयक पद्धतीचा समावेश
या सहकार्याचा एक विशेष पैलू म्हणजे एसआरटीएमयूच्या ललित कला विभागाचे आरोग्यशास्त्राशी होणारे एकत्रीकरण, ज्यातून मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धनाचा नवीन शैक्षणिक दृष्टिकोन विकसित होणार आहे.
दोन्ही संस्थांनी शिक्षक व संशोधकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद आणि नियमित बैठका घेऊन या कराराची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आश्वासन दिले आहे.या वेळी विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ मनोहर चासकर कुलसचिव डॉ डी डी पवार , प्रा. एम. के. पाटील – डीन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्रा. एस. जे. वाढेर – डीआयआयएल, प्रा. जी. कृष्ण चैतन्य – संचालक, सीआयसीएमआरआय डॉ. बी. एस. रेड्डी – संचालक, आयक्यूएसी डॉ. अशोक कदम – जनसंपर्क अधिकारी यांची उपस्थिती होती तर डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. शितल राठोड, डॉ उमेश अथ्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. या कराराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात प्रा. जी. कृष्ण चैतन्य, प्रा. एस. जे. वाढेर आणि प्रा. टी. ए. कदम यांचे विशेष योगदान राहिले.
