नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पाचोंदा गावात दोन महिलांचा गळा दाबून खून करण्यात आलेला गुन्हा नांदेड पोलीसांनी 12 तासात यवतमाळ पोलीसांच्या मदतीने उघडकीस आणला असून त्यातील दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. तक्रारीनुसार मरण पावलेल्या महिलांचे दागिणे चोरीला गेले होते. त्याचा शोध सुरू आहे.
दि.20 नोव्हेंबर रोजी मौजे पाचोंदा येथे अंतकलबाई अशोक अडागळे(55) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (50) या दोघी शेतात कापुस वेचणी करीता गेल्या होत्या. सायंकाळी त्या परत आल्या नाहीत तेंव्हा त्यांच्या घराच्यांनी पाहिले तेंव्हा त्या आपल्याच शेतात मरण पावलेल्या होत्या. त्यांचा गळा दाबलेला होता. त्यांच्या शरिरावरील दागिणे गायब होते. या तक्रारीवरुन माहुरचे पोलीस निरिक्षक चोपडे यांनी गुन्हा क्रमांक 191/2025 दाखल केला.
प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार नव्हता. परंतू आसपासच्या शेतातील लोकांनी दोन जणांना तिकडे फिरतांना पाहिले होते. त्यांच्या सांगण्यावरुन पुणे येथील तज्ञांकडून व्हिडीओ कॉलद्वारे संशयीतांचे रेखाचित्र बनविण्यात आले आणि त्यानुसार शोध सुरु होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, राजकुमार डोंगरे,मोहन हाके, ज्ञानोबा कवठेकर, दिलीपकुमार चंचलवार, सिध्दार्थ सोनसळे, रितेश कुलथे, धम्मा जाधव, मारोती मुंढे आणि दिपक ओढणे आदींनी यवतमाळ-आदिलाबाद-माहूर आणि किनवट भागात आरोपींचा शोध सुरू केला. त्यानुसार पोलीसांना माहिती मिळाली की, एक आरोपी सेलू करंजी ता.माहुर येथे आहे. पोलीस पथकाने तेथे जाऊन नाव गाव विचारले असता दत्ता सुरेश लिंगलवार (38) रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ असे होते. त्यांनी सांगितले की, करंजी ता.माहूर येथील गजानन गंगाराम येरजवार (41) याच्यासोबत त्याने हे दोन खून केले आहेत.
सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्या अहवालानुसार दोन्ही आरोपींनाकडून गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. या आरोपींची रवानगी माहुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या आरोपींनी त्या मरण पावलेल्या महिलांचे दागिणे काय केले याचा शोध सुरू आहे.
महिलांच्या दुहेरी हत्याकांडाला नांदेड पोलीसांनी 12 तासात उघड केले
