श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; थायलंड धम्मसहलीवरुन परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य सत्कारही होणार
नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज दि. १९ रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात कुशीनगर येथील भदंत डॉ. इंदवंश महाथेरो यांच्या प्रमुख धम्मदेसना कार्यक्रमासह विविध उपक्रम आयोजित करण्यात आला आहेत. याच कार्यक्रमात बौद्ध राष्ट्र थायलंड धम्मसहलीवरुन नुकतेच परतलेल्या बौद्ध उपासक उपासिका यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
येथील ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दरमहा पौर्णिमेच्या अनुषंगाने पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आज दि. १९ रोजी सकाळी १० वा. कार्यक्रमाला सुरुवात होईल. यात परित्राणपाठ, गाथपठण, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, आनापान ध्यानसाधना, भोजनदान, दान पारमिता, बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रमही होणार आहे. दरम्यान कुशीनगर येथून आलेले भदंत डॉ. इंदवंश महाथेरो यांची प्रमुख धम्मदेसना होणार आहे. याच कार्यक्रमात बौद्ध राष्ट्र थायलंड धम्मसहलीवरुन नुकतेच परतलेल्या बौद्ध उपासक उपासिका यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
