नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये जमीनीच्या मालकीची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला भोकर येथील जिल्हा न्यायाधीश नसीम मोहम्मद सलीम यांनी दोन वर्ष कारावास आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या संदर्भाने सविस्तर माहिती अशी की, मौजे कार्ला (पी) ता.हिमायतनगर येथे तक्रारदाराच्या वडीलांच्या नावाने 50 फुट लांब आणि 50 फुट रुंद असा भुखंड होता. त्या भुखंडावर पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले होते. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी तक्रारदाराच्या वडीलांनी 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर नोटरी करून अर्धा भुखंड दिला होता. या भुखंडाची नोंदणी गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी तक्रारदाराने ग्राम विकास अधिकारी बाबूराव राजाराम तावडे यांना 11 ऑगस्ट 2017 रोजी अर्ज आणि सर्व कागदपत्रे दिली. त्यावेळी तावडे यांनी ही नोंद घेण्यासाठी 12 हजार रुपये लागता असे सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर लाच मागणीची तपासणी झाली आणि यात तावडेने पंचासमक्ष 12 हजार रुपये लाच मागितली आणि तडजोडीनंतर 10 हजार रुपये लाच स्विकारली. या संदर्भाने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 202/2017 दाखल झाला होता. या बाबत भोकर न्यायालयात झालेले साक्षीपुरावे याच्या आधारावर जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नसीम मोहम्मद सलीम यांनी ग्राम वसिकास अधिकारी बाबुराव राजाराम तावडे यास दहा हजारांची लाच स्विकारण्यासाठी दोन वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचे दोषारोप तत्कालीन पोलीस निरिक्षक बी.एल. पेडगावकर यांनी दाखल केले होते. या प्रकरणात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरिक्षक रसुल तांबोळी, पोलीस अंमलदार प्रदीप कंधारे आणि वैशाली पुंडगे यांनी परिश्रम घेतले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. अनुराधा डावकरे यांनी बांजू मांडली.
2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास
