जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा
नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे किंवा नाही याबाबतची सर्व माहिती विभाग प्रमुखांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमान्वये दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी)अनिवार्य काढणेबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र कार्यालयास सादर केले आहे किंवा नाही याची तपासणी करुन त्यांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यात येणार आहे. जे अधिकारी-कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र सादर केले नाही, पडताळणीअंती ज्यांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी 40 टक्के पेक्षा कमी आहे, ज्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र बोगस आढळून आले अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार कारवाई करावी किंवा त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली करण्याबाबत निर्देश आहेत.
त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ गुरुवार 13 नोव्हेंबर 2025 पर्यत कार्यालयात, विभागात किती दिव्यांग आहेत, त्यापैकी किती जणांकडे युडीआयडी कार्ड आहेत. किती जणांनी सादर केले आहेत. अद्याप सादर न करणाऱ्यांची संख्या किती आहे याबाबतची सर्व माहिती तात्काळ उपजिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिले. सर्व विभागांनी माहिती सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे ओळखपत्र पडताळणीसाठी विशेष कॅम्पचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयास सादर केलेल्या दिव्यांगत्वाचे वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची कार्यवाही सुरु असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यावेळी दिली. या बैठकीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार यांनी दिव्यांगांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती तसेच जेष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये जेष्ठ नागरिकाप्रती संवेदनशिलता जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
