आज सकाळी सात वाजल्यापासून बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून, मतदार मोठ्या संख्येने मतदान करत असल्याचे चित्र दिसत आहे. मतदान सुरू होण्यापूर्वीच काल रात्री अमित शहांचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी एक मोठे वक्तव्य केले. त्यांनी जाहीर केले की “नरेंद्र मोदी यांची जादू बिहारमध्ये चाललेली नाही, आता बिहारमध्ये महाआघाडीची म्हणजेच तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार आहे.”

ओमप्रकाश राजभर हे उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा)चे अध्यक्ष आहेत आणि सध्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत. तरीसुद्धा, त्यांनी केलेले हे विधान बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे ठरले आहे.राजभर यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविषयीही अनेकदा तीव्र टीका केली असून, त्यांच्या बोलण्यामुळे राजकीय वाद निर्माण झाले आहेत. असे असले तरी, त्यांना उत्तर प्रदेशात मंत्रीपद मिळवून देण्यात अमित शहांचा मोठा हात आहे. पण आता त्यांनीच भाजपविरोधी विधान करून बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे सरकार येईल, असा दावा केला आहे.

राजभर यांनी आपले वक्तव्य समर्थनार्थ एक वेगळा तर्क दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा जेव्हा बिहारमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले, तेव्हा तेव्हा राष्ट्रीय जनता दल (राजद) सत्तेत आले.” त्यांनी यासाठी १९९०, १९९५ आणि २००० मधील निवडणुकांचे उदाहरण दिले —
१९९० मध्ये ६२.०४% मतदान झाले आणि लालू प्रसाद यादव सत्तेत आले,
१९९५ मध्ये ६१.७९% मतदान झाले आणि लालू यादव पुन्हा सत्तेवर आले,
२००० मध्ये ६२.५७% मतदान झाले आणि पुन्हा राजदचीच सत्ता आली.
राजभर यांनी हेही म्हटले की त्यांनी हा डेटा गुगलवर तपासला असून, गुगलनेही तेच दाखवले. त्यामुळे, त्यांच्या मते, यंदाही जास्त मतदान म्हणजे महाआघाडीचा विजय.राजभर यांची नाराजी फक्त इतकीच नाही की बिहारमध्ये भाजप जिंकणार नाही, तर त्यांना बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाला जागा मिळावी, अशी अपेक्षा होती. भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी त्यांना उमेदवारीबाबत आश्वासन दिले होते, पण एनडीएच्या आघाडीत जागांचे गणित जुळत नसल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळेच त्यांनी नाराजीच्या सुरात म्हटले होते की, “मी बिहारमध्ये ५२ जागांवर उमेदवार उभे करीन.” परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही आणि त्यांना शांत बसावे लागले.

या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजभर यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी केलेले हे वक्तव्य भाजपसाठी घातक ठरू शकते. कारण, निवडणुकीच्या वातावरणात अशा विधानांचा प्रचार जलदगतीने होतो आणि जनतेच्या मनावर त्याचा परिणामही होतो. राजकारणात कोणीही “हरणाऱ्या घोड्यावर” पैसे लावत नाही. जिंकण्याची शक्यता जास्त असलेल्या पक्षाकडेच लोकांचा कल असतो, असे म्हणावे लागेल.
