नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे शिवाजीनगरमधून एका पोलीस अंमलदाराचा लॅपटॉप चोरीला गेला आहे म्हणे. यानंतर सुरू असलेल्या चर्चांमध्ये लॅपटॉपवाला पोलीस अंमलदार दुसऱ्या पोलीस अंमलदारावर शंका व्यक्त करत आहे. पण यासंदर्भाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही आणि त्या लॅपटॉपमध्ये असलेला सरकारी टाडा आता कोणाच्या हातात आहे आणि तो त्याचा काय उपयोग करेल हे देवालाच माहित.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लिंबाजी राठोड नावाचे पोलीस अंमलदार आहेत. त्यांचाकडे एक लॅपटॉप होता आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे काम त्यांच्याकडे होते. दोन-चार दिवसांपुर्वी माझा लॅपटॉप चोरीला गेल्याची आरव त्यांनी उठवली. यासंदर्भान स्थानिक गुन्हा शाखेतून आलेल्या पोलीस अंमलदारावर संशय व्यक्त केला आहे. पोलीस अंमलदार पद्मसिंह कांबळे आणि बालाजी यादगिरवाड हे दोन पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हा शाखेतून शिवाजीनगरला आलेले आहेत. मग या लॅपटॉपचा पत्ता मात्र अजून काही लागला नाही.
लॅपटॉप चोरीला गेला असेल तर त्या संदर्भाची तक्रार दाखल होणे आवश्यक होती आणि जो कोणी चोर आहे तो शोधणे पोलीसांचे काम आहे. आता हा चोर शिवाजीनगर पोलीसांनीच शोधला असता किंवा स्थानिक गुन्हा शाखेने शोधला असता हा भाग वेगळा पण हा लॅपटॉप काही कारणामुळे स्वत:च गायब केला असेल तर त्याचा जबाबदार कोण? नागरीकांच्या घरी झालेली चोरी उघड करण्याची जबाबदारी पोलीसांवर असते. आता तर पोलीस ठाण्यातच चोरी झाली आहे. मग ती उघड करण्याची जबाबदारी कोणावर द्यायची हा एक नवीन प्रश्न यानिमित्ताने तयार झाला आहे.
पोलीस ठाणे शिवाजीनगरमधून लॅपटॉप चोरीला गेला म्हणे ; शोधायची जबाबदारी कोणाची
