६ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असताना, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विजय कुमार सिन्हा लकीसराय विधानसभा क्षेत्रातील खुरियारी या छोट्या गावात भेट देण्यासाठी गेले.गावात पोहोचताच लोकांनी त्यांना रोखले आणि प्रश्न विचारला, “पाच वर्षांत आमच्या गावात रस्ता दिला नाही, मग आम्ही तुम्हाला मतदान का द्यावे?” त्यावर कुमार सिन्हा यांनी उलट प्रत्युत्तर दिले, “जर मतदान दिले नाही, तर रस्ता मिळणारच नाही.”
या वक्तव्यामुळे जमाव संतप्त झाला. “ विजय कुमार सिन्हा हाय हाय!”, “ विजय कुमार सिन्हा मुर्दाबाद!”, “चोर! गद्दी छोड़!” अशा आरोळ्या सुरू झाल्या. लोकांच्या रोषाचा उफाळा इतका वाढला की काहींनी त्यांच्या गाडीवर चिखल, चप्पला आणि शेण फेकले.त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बल (सीआरपीएफ) चे जवान तैनात होते. मात्र, त्यांनी जनतेवर गोळीबार केला नाही, कारण त्यांच्या प्रशिक्षणानुसार फक्त जीवितास धोका निर्माण झाल्यासच गोळीबार करता येतो. शेण फेकल्याने धोका नव्हता, त्यामुळे जवानांनी संयम दाखवला. तरीही विजय कुमार सिन्हा यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून विचारले, “माझ्यावर हल्ला होत आहे, आणि तुमचे जवान गोळीबार करत नाहीत, मग आम्हाला सुरक्षा कशासाठी दिली?” वास्तविक, त्या ठिकाणी कोणताही प्राणघातक हल्ला झाला नव्हता. सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत उपमुख्यमंत्री यांना सुरक्षित गाडीत बसवून तेथून बाहेर काढले. परंतु विजय कुमार सिन्हा मात्र संतापाने सुरक्षाअधिकाऱ्यांना ओरडत राहिले. त्यावर अधिकारी काहीही बोलले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की त्यांच्या जवानांनी दिलेल्या जबाबदारी नुसार योग्यच काम केले आहे.
या घटनेदरम्यान विजय कुमार सिन्हा यांनी जनतेशी अतिशय उद्धट आणि आक्रमक भाषेत संवाद साधला. त्यांनी म्हटले, “सरकार येऊ द्या, मग दाखवतो काय करायचे ते. तुमच्या छातीवर बुलडोजर चालवू, औकात दाखवू.” निवडणुकीच्या दिवशी अशा प्रकारची धमकी देणं हे लोकशाहीच्या मुलभूत तत्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.
गावकऱ्यांचा रोष मात्र अनाठायी नव्हता. कुरियारी गावाचा रस्ता २००५ पासून आजतागायत तसाच खड्डे, चिखल आणि दुर्गंधीने भरलेला आहे. महिलांना घराबाहेर पडताना कपडे गुडघ्यापर्यंत वर करून चिखलातून चालावे लागते. मागील निवडणुकीत २०२० मध्ये दिलेली वचने पूर्ण झाली नाहीत, आणि २०२५ मध्ये पुन्हा तीच मागणी घेऊन नेते आले होते. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी होती.अशा प्रसंगी एक जबाबदार नेता काय करतो? त्याने नम्रतेने जनतेची माफी मागून आश्वासन द्यायला हवे होते की निवडून आलो किंवा न आलो तरी हा रस्ता मी बनवून देईन. पण उलट विजय कुमार सिन्हा यांनी गर्विष्ठ भाषेत धमक्या दिल्या आणि पत्रकारांनाही म्हटले, “सरकार बनवू द्या, मग दाखवू काय करायचं ते!”
त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस अधीक्षकसुद्धा संभ्रमात होते. ते एका उपमुख्यमंत्र्याचा बंदोबस्त करत आहेत की एखाद्या गुंडाचा? स्वतःला संस्कारी पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाचा हा नेता जनतेला आई–बहिणीच्या शिव्या देत होता. गावकऱ्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांनी फक्त विरोध केला होता, परंतु विजय कुमार सिन्हा यांनी घाणेरड्या भाषेचा वापर केल्यामुळेच लोकांचा संताप शेवटच्या टप्प्याला पोहोचला.
घटनास्थळी फेकलेले शेण काही सुरक्षारक्षकांच्या अंगावरही पडले. विडंबन असे की, ज्या शेणाला “चंदनासारखे पवित्र” म्हणणाऱ्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते, त्याच शेणाने त्यांच्या अंगावर जागा घेतली होती. जवान मात्र तटस्थ राहिले, कारण त्यांना माहिती होते की हा त्यांचा राजकीय प्रश्न नाही – त्यांचे काम फक्त सुरक्षा राखणे आहे.यानंतर विजयसिंह यांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याला पुन्हा फोन करून संतापाने विचारले, “आमच्या कपड्यांवर शेण पडलं, आणि तुमचे जवान गोळीबार करत नाहीत?” अधिकारी मात्र शांत राहिला, कारण त्याला ठाऊक होते की बेकायदेशीर गोळीबाराचा आदेश देऊन तो स्वतःला अडचणीत आणणार नाही.
गावातून निघाल्यानंतर रस्त्यावर त्यांची भेट आरजेडीचे एमएलसी अजय सिंह यांच्याशी झाली. त्यांच्याशीही विजय कुमार सिन्हा यांनी अकारण वाद घातला आणि सुरक्षा रक्षकांना आदेश दिले की “हा दारू पिऊन आला आहे, तपासणी करा.” अजय सिंह यांनी लगेचच पोलिस ठाण्यात जाऊन तपासणी करून घेतली आणि त्यांचा अहवाल शून्य आला. त्यामुळे विजयसिंह अधिकच अस्वस्थ झाले.
या साऱ्या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट झाली – जनतेचा रोष योग्य होता आणि सत्ताधाऱ्यांची अहंकारी वृत्ती उघड झाली. विजयसिंह यांनी जनतेची नव्हे, तर स्वतःच्या पक्षाची आणि पदाची प्रतिष्ठा घालवली. त्यांनी जनतेची “नाक कापण्याच्या” नादात स्वतःचीच “नाक कापली.”आजचा हा प्रकार केवळ एका गावाचा किस्सा नाही, तर लोकशाहीच्या आरशात उमटलेला एक धोकादायक प्रतिबिंब आहे. जर अशा लोकांचा सत्तेवर पुनरागमन झाला, तर लोकांवर बेछूट गोळीबार करण्यासाठी त्यांना एक मिनिटही लागणार नाही. प्रश्न एवढाच आहे — हीच का भारताची लोकशाही, आणि अशीच चालवायची आहे का?
