नांदेड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही नांदेडचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर आणि त्यांचे सहाय्यक महसूल अधिकारी कपिल काशिनाथ जांबकर यांनी कुळ कायद्याच्या तरतुदींना फाटा देत न्यायालयाच्या निकालाला विरोधात निर्णय दिल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात किशन लक्ष्मण कोकाटे (रा. चिमेगाव, ता. नांदेड) यांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज सादर करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे.
प्रकरणाचा पार्श्वभूमी
कोकाटे यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. 289/2018 मध्ये औरंगाबाद खंडपीठाने 25 जानेवारी 2025 रोजी निकाल दिला होता. हा निकाल मौजे साहेब, ता. नांदेड येथील सर्वे नं. 7/1, गट नं. 139, एकूण 13 एकर 29 गुंठे जमिनीशी संबंधित आहे. ही जमीन कुळधारक लक्ष्या राध्या यांच्या नावे होती. त्यांच्या वारसदार म्हणून कोकाटे यांनी मालकी हक्कासाठी अर्ज केला होता.उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते की, हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम 1950 कलम 98 नुसार मालकी देण्याचा अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे आणि त्यांनी ती मालकी हक्कास पात्र व्यक्तीला द्यावी. परंतु, आरोपानुसार, न्यायालयाच्या या स्पष्ट निर्देशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट निर्णय देऊन कुळधारकाविरुद्ध निकाल दिला.
“पैसे मागितले आणि नकार दिल्यावर चुकीचा निकाल दिला” – अर्जदाराचा आरोप
अर्जदार कोकाटे यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, महसूल सहाय्यक कपिल काशिनाथ जांबकर हे त्या काळात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कुळ व इनामी जमिनीच्या टेबलवर कार्यरत होते आणि त्यांनी “पैशाचा व्यवहार” केला असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोकाटे यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यावर, त्यांनी विरुद्ध पक्षाकडून पैसे घेऊन चुकीचा निकाल दिला, असा आरोप त्यांच्या अर्जात नमूद आहे.
पुरावे आणि अभिलेख मुख्यमंत्र्याकडे सादर
कोकाटे यांनी आपल्या अर्जासोबत अनेक दस्तऐवज जोडले आहेत —
- कुळवाल लक्ष द्या यांच्या नावाचा सातबारा उतारा,
- उच्च न्यायालयाचा निकाल,
- अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल,
- तहसीलदार व तलाठी सायाळ यांच्या आदेशांच्या प्रती (सन 2014),
- तसेच 2014 मध्ये वारसाच्या नावावर नमूद झालेल्या जमिनीचा अभिलेख.
हे सर्व कागदपत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांवर आधीपासून चर्चा
नांदेडमधील माजी अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही काही चर्चेचा विषय निर्माण झाला होता. त्यांनी “काही फुकटचा प्रभाव दाखवणाऱ्या व्यक्तींच्या दबावाखाली अनेक .निर्णय घेतल्याची” चर्चा त्या काळात झाली होती. आता कोकाटे यांनी केलेल्या नव्या तक्रारीमुळे ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मुख्यमंत्री कार्यालयाकडून या तक्रारीवर पुढील कार्यवाही होते का, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि कुलधारकांचे लक्ष लागले आहे.
