एन्काऊंटरचा राजा की अवैध्य संपत्तीचा बादशहा?

७५ हजार रुपये दरमहा पगार घेणारा अधिकारी शंभर कोटींपेक्षा जास्त संपत्ती उभारू शकतो का? उत्तर प्रदेशातील सार्वजनिक क्षेत्रात, “सिस्टीम”मध्ये राहून हे शक्य झाले आहे आणि हा खेळ योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात घडला आहे..

या कथेत मुख्य नाव आहे डीएसपी ऋषिकांत शुक्ला. १९९८ ते २००९ दरम्यान कानपूर येथे ते पोलीस उपनिरीक्षक (दरोगा) म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांची प्रतिमा गुन्हेगारी विश्वात “धाकदायक” अशी होती. त्यांनी आपल्या पोलीस सेवाकाळात तब्बल २२ एन्काऊंटर केले असल्याचा दावा केला जातो.परंतु हाच “एन्काऊंटर” हा शब्द त्यांनी लोकांना धमकावण्यासाठी हत्यार म्हणून वापरला. एन्काऊंटरमध्ये मारून टाकण्याची भीती दाखवून त्यांनी अनेकांकडून संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. कानपूरमध्ये नियुक्त असताना त्यांनी शंभर कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती कमावल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. काही अंदाजानुसार, त्यांच्या नावावरची एकूण मालमत्ता २०० ते ३०० कोटी रुपये इतकी असल्याचा आरोप आहे.या संपत्तीच्या जोरावर त्यांनी कानपूर ते लखनौपर्यंत महागडी घरे, आलिशान गाड्या आणि एकेक एकरांमध्ये पसरलेल्या जमिनी खरेदी केल्या. तपासणी सुरू झाल्यानंतर त्यांची बदली मैनपुरी येथे झाली होती. सध्या ते निलंबित असून तपास विजिलन्स विभागाकडे सोपवण्यात आला आहे.

कानपूरमध्ये ऍड. अखिलेश दुबे नावाचे वकील तुरुंगात आहेत. एसआयटी तपासात उघड झाले की, दुबे आणि डीएसपी शुक्ला मिळून लोकांना धमकावून, खोट्या केसेस दाखल करून आणि खंडणी वसूल करून मोठा रॅकेट चालवत होते. “एन्काऊंटर”ची धमकी देत त्यांनी बिल्डर आणि व्यापाऱ्यांच्या जमिनी बळकावल्या.दोघांनी मिळून एक रिअल इस्टेट कंपनी स्थापन केली होती, ज्यामध्ये शुक्लांची पत्नी प्रभा शुक्ला ही सुद्धा भागीदार आहे. या कंपनीद्वारे काळ्या पैशाचे पांढरे करण केले जात होते. कंपनीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प उभे केले गेले. अधिकृत परवानग्या मिळवण्यासाठी सरकारी प्रणालीत घोटाळे करण्यात आले. स्वस्त दराने नोंदणी केलेल्या जमिनी नंतर कोट्यवधी रुपयांना विकल्या जात होत्या.

एसआयटीच्या अहवालानुसार, शुक्लांनी आपल्या कार्यकाळात लखनौ, कानपूर, फतेहपूर, इटावा आणि मैनपुरी येथे १२ ठिकाणी संपत्ती उभी केली आहे, ज्यांची एकत्रित किंमत सुमारे ९२ कोटी रुपये आहे. त्यांचे आलिशान घर लखनौच्या महागड्या आर्य कॉलनी परिसरात आहे, जिथे छोट्या दुकानांची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.या संपत्त्या शुक्ला यांनी आपल्या पत्नी, नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर खरेदी केल्यामुळे अनेक मालमत्तांवर एसआयटीला ताबा मिळवणे कठीण झाले आहे. मात्र तपासाचा फास आवळल्यानंतर अनेक पीडित लोक पुढे आले आहेत.

त्यापैकी एक म्हणजे मनोहर शुक्ला, ज्यांनी सांगितले की, त्यांनी ऋषिकांत शुक्लांसोबत भागीदारीत जमीन घेतली होती. काही वर्षांत त्या जमिनीची किंमत ६० कोटींवरून ७० कोटी झाली. पण मनोहर यांनी आपला हिस्सा मागितल्यावर शुक्लांनी त्यांना बंदूक दाखवून “एन्काऊंटर”ची धमकी दिली आणि पैसे देण्यास नकार दिला. मनोहर यांनी कायदेशीर मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण शुक्लांच्या प्रभावामुळे कोणतीही तक्रार पुढे गेली नाही.असे सांगितले जाते की, राजकीय संरक्षणाशिवाय असा प्रकार घडणे अशक्य आहे. पत्रकार निखत अली सांगतात की, “डीएसपी ऋषिकांत शुक्ला हा खाकी वर्दीवरील एक काळा डाग आहे.”

मागील वर्षी त्यांच्या मुलाचे लग्न एका आलिशान रिसॉर्टमध्ये झाले, ज्यावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. ७५ हजार रुपये महिन्याचा पगार असणाऱ्या अधिकाऱ्याने एवढा खर्च कसा केला, हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला. त्या लग्नाला अनेक खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सौरभ भदोरिया नावाच्या तक्रारदाराने आरोप लावला आहे की, ऋषिकांत शुक्ला आणि त्यांच्या मुलाने मिळून २०० ते ३०० कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमवली आहे. नोएडा ते चंदीगड या अनेक शहरांमध्ये त्यांच्या बेनामी मालमत्ता आहेत. कानपूरच्या आर्य नगर भागात त्यांच्याकडे ११ दुकाने आहेत आणि त्यांच्या मुलाने ३३ कंपन्या उघडल्याचे उघड झाले आहे.सौरभ भदोरिया म्हणतात, “अशा अधिकाऱ्याला सेवेत ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला संरक्षण देणे आहे. एवढा मोठा कारभार राज्य सरकारच्या माहितीतून कसा राहू शकतो?”

१९६८ मध्ये जन्मलेले ऋषिकांत शुक्ला हे मूळचे देवरिया जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी १९८७ मध्ये पोलीस सेवेत प्रवेश केला आणि विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम करत अखेर डीएसपी पदापर्यंत मजल मारली. पण या प्रवासात त्यांनी केवळ एन्काऊंटरच नव्हे, तर अवैध संपत्तीचा साम्राज्य उभा केल्याचा गंभीर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!