नांदेड–शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगा (युजीसी) तर्फे ‘डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी’ संस्थेच्या कार्यकारी परिषदेवर (Executive Council) आणि वित्त समितीवर (Finance Committee) युजीसी प्रतिनिधी (Nominee) नेमण्याची तरतूद आहे.
या पार्श्वभूमीवर युजीसीचे मा.अध्यक्ष यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची नियुक्ती आंध्र प्रदेश राज्यातील ‘आदिशंकरा डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, गुडूर’ या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर युजीसी नामनिर्दीशीत सदस्य म्हणून केली आहे. ही नियुक्ती यूजीसी (Institutions Deemed to be Universities) Regulations, 2023 च्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.
डॉ. महाजन हे उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व संशोधननिष्ठ प्रशासक असून, त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, सह-संचालक, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
