वाळू माफीयांवरच्या कार्यवाहीचे काय गमक
नांदेड(प्रतिनिधी)-अतिवृष्टी आणि पावसाने यंदा वाळू माफीयांसाठी सुलभ परिस्थिती तयार करून दिली. त्यातच वाळू माफीयांसाठीचा दिवाळी बोनस असा ठरला की, परवा दि.27 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे गेले आहेत. त्यांची रवानगी झाल्याबरोबर त्यांच्या बदलीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. तरी पण स्थानिक गुन्हा शाखा आणि काही पोलीस ठाण्यांनी वाळू संदर्भाचे गुन्हे दाखल केले आहेत. याचे काय गमक आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे गमक लिहिले तर पुन्हा एकदा वास्तव न्युज लाईव्हला नोटीस दिली जाईल. प्रसंगी गुन्हा दाखल केला जाईल त्यामुळे गमक वाचकांनी स्वत: समजून घ्यायचे आहे.
निसर्गाने यंदा वाळू माफीयांवर भरपूर मेहरबानी केली. आज सुध्दा कै.डॉ.शंकररावजी चव्हाण प्रकल्पाची काही दारे उघडी आहेत. म्हणजे पाणी वाहत आहे. पुर्वी अतिवृष्टी झाली. काही दिवस तर विष्णुपूरी धरणाची 17 दारे उघडी होती. एक खराब असल्यामुळे ते 18 वे दार बंद होते. म्हणजे पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी वाहतच राहिले. म्हणजे त्यामुळे भरपूर रेती जमत असते. हा प्रसंग वाळू माफीयांसाठी सुकाळाचा प्रसंग आहे. ते आनंदीच होते. काही वाळू माफीया मोदकप्रसाद देवून आपले कारभार चालवित होते. तर काही वाळू माफिया मोदकप्रसाद देतच नव्हते. पण आपला कारभार चालवित होते.
निसर्गासह एक आनंदाची बातमी वाळूमाफीयांना 27 ऑक्टोबर रोजी मिळाली. की, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे हजर नाहीत. त्यात खरे असे आहे की, ते एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल ऍकॅडमीमध्ये गेले आहेत. त्याठिकाणी देशभरातून जवळपास 65 आयपीएस अधिकारी आहेत. त्यात महाराष्ट्र राज्याचे 17 ते 20 अधिकारी आहेत. पण शहाजी उमाप यांच्या रवानगीसोबतच दुसरी अफवा पसरली. ते प्रशिक्षणानंतर पदोन्नत होती आणि त्यांची बदली होईल. अशा आनंदाच्या प्रसंगात वाळू माफीयांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर काही पोलीस ठाण्यांनी केलेली कार्यवाही मात्र आश्चर्यकारक वाटते. हे आश्चर्य का आहे हे आम्हाला लिहिता येते. परंतू त्यानंतर येणारी नोटीस, त्यानंतर द्यावे लागणारे उत्तर किंबहुना एखादा गुन्हा दाखल होईल. तो पुन्हा निपटारा करावा लागेल. त्यामुळे ते आश्चर्य आणि गमक काय आहे हे वाचकांनी स्वत: समजून घ्यायचे आहे.
वाळू माफियांसाठी खूश खबर… ; शहाजी उमाप प्रशिक्षणासाठी गेले आणि अफवा पसरली बदली होणार !
