मी अनुभवलेले कै.आ.गोविंदराव राठोड (जी.एम.)साहेब

भारतीय संस्कृतीने ‘मातृदेवो भव’ ‘पितृदेवो भव’असा गौरव आई-वडिलांच्या संबंधाने केला आहे. यापुढे जाऊन आपल्या शास्त्राने पिता पाच प्रकारचा सांगितला असून जो आपणास अन्नपाण्याची व अडीअडचणीत मदत करतो तो ही एक पिताच असे म्हटले आहे.त्या अर्थाने माझ्या आयुष्यात पित्याचे प्रेम मिळालेले व्यक्तिमत्व म्हणजे परम श्रद्धेय कै. गोविंदरावजी राठोड साहेब (जी.एम.साहेब) होत.तसा माझा जन्म लातूर जिल्ह्यातील.मुखेडला आयुष्यात कधी येण्याचा योग आला नाही. लहानपणापासून मुखेड नावाचे एक गाव अहमदपूरच्या पूर्वेला कुठे तरी आहे हे परळी मुखेड बस गाडी सकाळी आमच्या गावाहून येत असल्यामुळे माहिती होते.पण शिरूर ताजबंदच्या अलीकडे मुखेडला येण्याचा योग कधी आला नाही. तो आला तो नोकरीच्या वेळीच. ज्या दयानंद कला महाविद्यालयातून मी 1992 ला हिंदी या विषयात एम.ए. झालो तेथील माझे गुरु प्रा.डॉ. सूर्यनारायण रणसूभे सरांनी माझ्या नोकरीसाठी एक पत्र त्यावेळी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मित्राला म्हणजेच आदरणीय प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार सरांना माझ्याजवळ दिले व तू भेट तुझे नोकरीचे काम होईल असे सांगितले.मी तेंव्हा ते पत्र घेऊन मुखेडला आलो. येताना डोंगराळ भाग बघून कुठेतरी दुसऱ्या भागात जात असल्याचा भास होत होता.नंतर वसंतनगरला आलो.भितभित प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन पत्र दिले.त्यांनी आदरातिथ्य करून नोकरीवर उद्यापासून या असे सांगितले व गावाकडे जावयाला पैसे आहेत का ? व अन्य काही प्रश्न विचारून आस्थेवाईकपणे चौकशी केली. मला नोकरी मिळाल्याचा गगनात मावेनासा आनंद झाला.पण मुखेड व वसंतनगर परिसरातच नाही तर बस प्रवासात देखील महाविद्यालयाचे नाव सांगितले की लोक म्हणायचे ते जी.एम.साहेबांचे कॉलेज का ? मला सुरुवातीला जी.एम. साहेब म्हणजे काय ते कळालेच नाही.मला वाटले जी.एम. साहेब म्हणजे जनरल मॅनेजर साहेब असावेत पण नंतर कळाले की त्यांचे नावातील जी.म्हणजे गोविंदराव व एम.म्हणजे मक्काजी.सुरुवातीचे काही महिने तर ते संस्थाचालक आहेत हे माहीत होते पण भेटण्याचा योग आला नाही. सहा एक महिन्याने प्राचार्य साहेबांच्या कार्यालयात त्यांना माझी ओळख तत्कालीन प्राचार्य कुंभार सरांनी करून दिली. त्यानंतर मात्र माझ्या सूत्रसंचालनाने,पुढे पुढे भाषणाने ते प्रभावीत झाले.मुळात मी त्यावेळी मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. हिंदी या विषयात सुवर्णपदक प्राप्त केलेले होते.हा मुलगा आपल्याकडे राहावा असे त्यांना नेहमीच वाटायचे म्हणून त्यांनी सतत मला मुलागत प्रेम दिले. एवढेच नव्हे तर माझ्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन मुलगी पाहण्यापासून लग्नापर्यंत सोबत केली.आताच्या जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु.) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गोपीनाथ केंद्रे यांचा आणि त्यांचा संबंध असल्यामुळे हे स्थळ मला मिळवुन दिले.एक संस्थाचालक माणूस आपल्यावर एवढे प्रेम करतो या प्रेमाने मी भारावून गेलो.सुरुवातीच्या काळात महाविद्यालय विनाअनुदान तत्त्वावर चालत होते. त्या काळात त्यांनी अनुदाना इतकी पगार आम्हाला दिली.एवढेच नाही तर आमच्या प्रत्येक सुखदुःखात हिरीरीने सहभाग नोंदवला.मी सेट उत्तीर्ण झालो याचा त्यांना गगनात मावेनासा आनंद झाला.त्यांनी चांदीच्या रथासह माझा संस्थेकडून भव्य सत्कार घडवून आणला. नातेवाईकांपेक्षा गुणी माणसांच्या गुणांवर ते जीवापाड प्रेम करत असत.मी मुखेडला घर बांधावे असा त्यांचा आग्रह होता.त्यासाठी त्यांनी भूमिपूजनासाठी वेळ ही दिला होता. त्यावेळी ते नांदेडला जिल्हा परिषदेत सभापती होते.मी भूमिपूजनाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती पण अचानक त्या दिवशी त्यांच्या सासूबाई का सासरे दोघांपैकी एकजण वारले होते.ते अंत्यविधीला सुलाळी डोंगरगाव ता.जळकोट येथे गेले होते.तेथील अंत्यविधी संपवून सायंकाळी उशिरा माझ्या घराच्या भूमिपूजनाला त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली व घराचे बांधकाम होईपर्यंत सतत भेटी दिल्या.ते संस्थाचालक व मी कर्मचारी असे कधी जाणवलेच नाही.तरी परंतु साहेबांची नैतिक भीती आमच्या मनावर सतत असायची.त्यांचे वर्तन हे ‘आधी केले मग सांगितले’ असे होते. स्वतः वेळ देणे,स्वतः आडी अडचणीत मदत करणे, सुखदुःखाला धावून जाणे ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने त्यांच्याकडे होती.त्यांचे ग्रंथावर जीवापाड प्रेम होते.म्हणून ते सतत नवनवीन ग्रंथ ग्रंथालयासाठी खरेदी करायचे म्हणून आज आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय सुसज्ज बनले आहे.त्यांनी मला भारतातील भटक्या-विमुक्तांसाठी सुरू केलेल्या एकमेव विद्यानिकेतन कमळेवाडीचा पहिला प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली.मी ही हे काम माझे नवीन लग्न झालेले असताना देखील सकाळी ७.०० ते रात्री १०.०० पर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे केले.विद्यार्थ्यांसाठी यावेळी विविध उपक्रम राबवून ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.या कामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड व जी.एम.साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.साहेबांना विचारवंतांना बोलावून त्यांची भाषणे ऐकण्याचा व परिसरातील लोकांना ऐकविण्याचा वेगळाच उत्साह होता.त्यासाठी ते भरभरून पैसे खर्च करायचे.केवळ श्रोत्यांची बौद्धिक भूकच भागवत नसून नंतर श्रोत्यांना पोटभर जेवणाची व्यवस्था ही करायचे.पंगतीत जातीने फिरून कुणाला काही कमी पडणार नाही ना ?हे पाहायचे व सगळ्यांच्या शेवटी जेवण करायचे.साहेबांनी माझ्यासारख्या माणसाला वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य करून एक प्रकारे उच्च शिक्षणातील सर्वोच्च संधीही उपलब्ध करून दिली.जन्म देणाऱ्या आई-वडिलांचा सहवास आपणास आयुष्यभर लाभतोच पण कधी कधी नोकरीच्या निमित्ताने ज्या संस्थेत आपण काम करतोत त्या संस्थाचालकांचे प्रेम हे आई-वडिलांपेक्षा तसूभर ही कमी नसते.हा अनुभव त्यांच्याकडून मला मिळाला. अगत्याने घरी यायचे,अगत्याने घरी बोलवायचे,सोबत घेवुन जेवण करायचे,सोबत चहा घेणे, अस्या कितीतरी आठवणी दाटून येतात.मुखेड विधानसभेसाठी ते जेंव्हा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले.त्यांच्या प्रचार दौऱ्यात जवळपास सर्वच गावांमध्ये मी व विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड साहेब, तसेच माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे सर,यशवंत बोडके सर आम्ही उपस्थित होतो. प्रचारादरम्यान जवळपास १०० पेक्षा अधिक ठिकाणी प्रचाराची भाषणे मी केली.निवडणूक संपल्यावर त्यांनी आवर्जून डॉ.माधव पाटील उच्चेकर यांच्या घरी आम्हा प्रचार करणाऱ्या टीमला जेवणासाठी निमंत्रण दिले.आमच्यासोबत जेवण केले व अभिमानाने म्हणाले की हे माझे स्टार प्रचारक आहेत आणि माझ्या निवडणुकीत यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.हे सांगण्यासाठी जो मनाचा मोठेपणा लागतो तो मोठेपणा साहेबांकडे खूप मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी पहावयास मिळत असे.गरिबांची मुले शिकली पाहिजेत, वसतिगृहातील मुलांना दर्जेदार जेवण व शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते जातीने लक्ष घालत असत.वरकरणी फणसासारखे त्यांच्या बोलण्यात कटूता (काटे) दिसत असले तरी आतून ते मधुर (मधाळ)होते.मी प्राचार्य पद सोडल्यावर माझी पगार कमी झाल्याने त्यांना अनेक वेळेस वाईट वाटले व तसे त्यांनी बोलून ही दाखवले.ही ओतप्रोत संवेदनशीलता त्यांच्याकडे होती. कुठल्याही माणसाचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी ते सतत घेत असत. त्यांच्यासोबत वीस वर्षापेक्षा अधिकचा काळ घालवला तो वेळ कसा गेला हे कळलेच नाही. राठोड परिवारातील एक सदस्य या नात्यानेच मुलागत त्यांनी सतत प्रेम दिले.त्यामुळे मुखेड हे शहर परके वाटलेच नाही.त्यामुळे कधीही हे शहर सोडून इतरत्र नोकरी शोधावी,कुठल्या मोठ्या शहरात जावे असे जाणवले नाही.दानशूरूपणा,अन्नदान करण्याचे औदार्य साहेबांसारखे मला इतरत्र कुठेच पाहावयास मिळाले नाही.ते सुजान पालक ही होते.त्यांनी आपल्या सौभाग्यवती चक्रावतीबाई यांच्या सहकार्याने आपल्या चार ही मुलांना उच्च विद्याविभुषित केले.आपले वडील बंधू माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड साहेब यांचा सल्ला घेऊनच ते काम करत असत. आधुनिक काळातील ही राम लक्ष्मणाची जोडी होती.स्वतः उन्हा तानात उभे राहून संस्थेसाठी टोलेजंग इमारती उभ्या केल्या.कधी कधी आम्ही सावलीला आसरा घेण्याचा प्रयत्न करत असू पण त्यांना कामापुढे ऊन,वारा,पाऊस याची तमा वाटत नसे.विद्यार्थ्यात ते रमून जात असत. ‘व्हावे लहानाहुनी लहान’ ही भूमिका त्यांची असे.एखाद्या माणसाला रागावले तरीही त्याचे नुकसान करावे अशी सूडबुद्धी तीथे दिसलीच नाही.उलट साहेब रागावले म्हणजे आता आपले काम होणार असा त्याचा अर्थ काढला जात असे.एखाद्या पुस्तकाविषयी किंवा नवीन काही माहिती हवी असली की ते मला विचारत असत.त्यामुळे सतत मला वाचन करावे लागे व अपडेट राहावे लागे.आज माझ्या लेखनात व व्याख्यानात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नामांकित वक्ते व साहित्यकारांना जळून पाहण्याचा व ऐकण्याचा योग त्यांच्यामुळेच आम्हाला लाभला. कृतज्ञतेची भावना त्यांच्याकडे ओतप्रोतपणे भरलेली होती. वंचित,उपेक्षित,दलित व भटके यांच्या विषयीची कणव त्यांच्या अंतकरणात सतत जाणवत होती.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.ते दलितमित्र पुरस्काराने ही सन्मानित झाले.राजकारण असो,समाजकारण असो त्यात भलेपणाची भलावन व खोटेपणाला विरोध हे त्यांचे ठरलेले होते.आज असा एकही दिवस जात नाही की साहेबांची आठवण येत नाही.
मी सहपरिवार तिरुपतीला निघालो होतो.रेल्वे मुदखेडहुन रात्री बारा वाजता निघाली.तेवढ्यात निरोप मिळाला की साहेब गेले,लगेच पुढच्या धर्माबाद स्टेशनला मी व माझी पत्नी उतरलोत.एका मित्राकडे रात्री थांबून सकाळी साहेबांचे अखेरचे दर्शन घेतले. साहेबांशिवाय जगणे म्हणजे प्राणावीना शरीरासारखे आहे असे मला वाटते.त्यांनी जाण्याची योग्य वेळ साधली का नाही मला माहिती नाही पण त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्याचेच नव्हे तर मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले.जे नुकसान कधीही न भरून निघण्यासारखे आहे.मी आजपर्यंत साहेबांवर अनेक लेख लिहिले,माझे ग्रंथ साहेबांना अर्पण केले,एका ग्रंथात दोन्ही राठोड बंधूवर विस्ताराने लिहिले तरीही मन भरत नाही.त्यांच्याबद्दल सतत बोलावे, लिहावे असे वाटते.साहेबांची स्मरणशक्ती दांडगी होती. एखाद्या माणसाला भेटल्यावर पुन्हा त्याला ते कधीच विसरत नसत.एखाद्या प्रसंगाची आठवण ते कित्येक वर्षानंतर करून देत असत.मी तसा खूप भाग्यवान होतो कारण पितृवत प्रेम मला साहेबांकडून मिळाले.मी साहेबांचा फार लाडका होतो. महाविद्यालयात पाऊल ठेवताच पहिली दोन नावे साहेब घ्यायचे त्यातील एक नाव माझे असायचे. एखाद्या महिन्यात कार्यक्रम झाला नाही असा महिना गेल्याचे मला आठवत नाही.कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे ?वक्ता कोण असावा ?पत्रिका किती काढाव्यात ? पासून सर्व प्रक्रियत ते मला सामावून घेत असत. मुख्यमंत्र्याच्या सभेपासून अन्य कुठल्याही सभेचे निवेदन करण्याची संधी ते मला देत असत. त्यामुळे मी थोडा अहंकारी ही आतून बनलो होतो. असे आज मला वाटते. त्यांच्यासोबत दिल्ली,मुंबई व अन्य ठिकाणी जाण्याचा वेळोवेळी योग आम्हाला लाभला.त्यांचे विचार आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे.त्यांनी वेळोवेळी केलेली व्याख्याने शब्दबद्ध करून ठेवले आहेत.कधीतरी त्याला स्वतंत्र ग्रंथ रूपाने प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे.तो साहेब कधी पूर्णत्वास नेतील हे पाहू.तो पर्यंत त्यांच्या कार्याला व प्रतिमेला विनम्र अभिवादन करून माझा शब्दप्रपंच थांबवतो.

–प्रा.डॉ.रामकृष्ण बदने,
ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी -9423437215

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!