माहूर | श्रद्धा, सेवा आणि सज्जनतेचा संगम! देवस्थान माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग हरवली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बॅग संपूर्ण ऐवजासह परत मिळाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि देवदर्शनासारखा आनंद झळकला.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील योगेश किशोर धारॊरकर हे भक्त माहूर येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांच्या बॅगेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून ₹३.६० लाखांचा ऐवज होता. दर्शनाच्या गर्दीत ती बॅग कुठेतरी हरवली. क्षणभरात स्वप्नभंग झाल्यासारखी अवस्था झाल्यावर त्यांनी तातडीने माहूर पोलीस ठाण्याचा धाव घेतला.
त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ज्यामध्ये पोलीस अंमलदार चौधरी, प्रकाश गेडाम आणि सोनू भुरके यांच्या मदतीने सखोल शोधमोहीम हाती घेतली. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर शेवटी माणूस शहरातील ‘रोशन सायकल स्टोअर’जवळील परिसरात ती बॅग गेडाम यांना सापडली.
बॅग पंचांसमक्ष उघडण्यात आली असता त्यातील सर्व रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जसाच्या तसा सापडले. त्यानंतर हा ऐवज विधिवत पंचनामा करून भाविक योगेश धारोरकर यांना परत करण्यात आला.भाविकांनी पोलिसांचे आभार मानत भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली “देवीच्या दरबारात सेवा करणाऱ्या या पोलिसांनी आमचं हरवलेलं सुख परत दिलं.”या प्रामाणिक कार्याबद्दल माहूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांनी पोलिस पथकाचे मनापासून कौतुक केले आहे. “धर्माच्या नगरीत प्रामाणिकतेचा विजय ,माहूर पोलिसांनी दिली मानवतेची सुंदर शिकवण!”
