दोन बॅंकांमध्ये धनादेश चोरून दुसऱ्यांच्या नावावर वठवले ; 4 लाख 53 हजारा 755 रुपयांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-दोन बॅंकांमध्ये फसवणूक करण्याच्या उद्देशाने 4 लाख 53 हजार 755 रुपयांचे दोन धनादेश चोरून नेऊन दुसऱ्या बॅंकेमध्ये दुसऱ्याच खात्यादाराच्या नावावर जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बॅंकेमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारामध्ये ही एक नवीन वाढ झाली आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखा वजिराबाद येथील अधिकारी किरणकुमार गोविंदराव जिंतूरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.10 ते 11.16 या सहा मिनिटाच्या वेळेत बॅंकेतील व्यवस्थापक, सहकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेवून दोन अनोळखी माणसांनी धनादेश भरत असतांना जी पावती भरावी लागते त्यात दुरूस्ती करायची आहे असे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा वजिराबादचा धनादेश जो धनादेश योगेश माधवराव अलबलवाड यांच्या नावाचा होता. तो घेतला आणि बॅंकेतून चोरून नेला. या धनादेशावर 2 लाख 53 हजार 755 रुपयांची रक्कम नमुद होती.चोरी करणाऱ्यांनी धनादेश बॅंक ऑफ बडोदा शााखा आनंदनगर येथे नेऊन अमर टेपेकर या व्यक्तीच्या नावावर जमा केला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 438/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव हे करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत डॉक्टर्स लेन येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी राजू अनंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.28 ते 1.38 अशा 10 मिनिटाच्या वेळेत बॅंकेतील अधिकारी आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांची दिशाभुल करून धनादेश भरतांना भराव्या लागणाऱ्या पावतीमध्ये बदल करायचा आहे म्हणून द नांदेड मर्चंटस्‌ को.ऑ.बॅंकेचा शोईबखान खलील खान यांच्या नावाचा दोन लाख रुपयांचा धनादेश चोरून नेला. त्यामध्ये सुध्दा धनादेश धारकाच्या नावामध्ये बदल करून त्यावर आमर टेपेकर असे नाव टाकले आणि तो धनादेश सुध्दा बॅंक ऑफ बडोदा शाखा आनंदनगर येथे जमा केला. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा क्रमांक 437/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माडगे अधिक तपास करीत आहेत.
बॅंकांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पध्दतीच्या फसवणूक झाल्याचे प्रकार आम्ही अगोदरही लिहिलेले आहेत. सोबतच ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडतात. त्यामध्ये ज्या खातेदाराची फसवणूक होते. त्या खातेदारांना असलेल्या कमी माहितीमुळे असे प्रकार घडतात. पण या दोन प्रकारांमध्ये घडलेला प्रकार यासाठी जास्त गांभीर्याचा आहे की, त्यामध्ये बॅंकेच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि हालगर्जीपणा सुध्दा दिसतो. एवढेच नव्हे तर जे दोन्ही चेक बॅंक ऑफ बडोदा शाखा आनंदनगर येथे आनंद टापेकरच्या नावावर जमा झाले आणि त्याने ते पैसे उचलले सुध्दा आहेत. मग पुढे या प्रकरणातील ज्यांच्या नावाचे जे धनादेश होते आणि ज्यांनी दिले होते. त्यांच्या आपसामध्ये ही चर्चा झाली. तेंव्हा बॅंकेला जाग आली आणि बॅंकेने मग गुन्हे दाखल केले आहेत. मग जनतेचे पैसे कोठे तरी सुरक्षीत आहेत. हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!