नांदेड (प्रतिनिधी)- येथील सचखंड श्री हजूर साहीब येथे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरा होणारा ‘तख्त स्नान’ सोहळा आज अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. “साथ संगत”, म्हणजेच सामान्य नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि या उत्सवाची सांगता अत्यंत आनंदात व भक्तिभावात झाली.
दरवर्षी दिवाळीच्या आधी, विशेषतः नरक चतुर्दशीच्या दिवशी, हा विशेष सोहळा सचखंड श्री हजूर साहीब येथे आयोजित केला जातो. आज सकाळी ९ वाजता, गुरुद्वाराचे मुख्य पुजारी जथेदार संत बाबा कुलवंतसिंघ यांनी पंच प्यारे साहेबांसह प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर ‘सात संगत’ (नागरिक) आपापल्या घरातून पाणी भरण्यासाठी लागणारे भांडे, कलश व इतर साहित्य घेऊन गोदावरी नदीकडे गेले.तिथून पवित्र पाणी भरून ते पुन्हा सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे आले आणि त्या पाण्याने श्री हजूर साहिब तख्तला स्नान घालण्यात आले.
हा सोहळा दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होता. संपूर्ण गुरुद्वारा परिसर उत्साहाने भरून गेला होता. या सोहळ्यात सचखंड श्री हजूर साहिब दरबारातील सर्व शस्त्रं, जमीन व परिसर पवित्र पाण्याने धुतले जातात. संपूर्ण परिसर भक्तिभावात न्हाऊन निघतो आणि प्रत्येक क्षणात सहभाग घेतलेल्यांमध्ये एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव जाणवतो.या प्रसंगी प्रौढ, महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालक-बालिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या दृश्य सोहळ्याचे साक्षीदार होणे, ही एक अत्यंत आनंददायी आणि मनाला स्पर्श करणारी अनुभूती ठरते.
