कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणानी कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणानी त्यांना सोपविलेली कामे विहित वेळेत समन्वय ठेवून पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
बैठकीस रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंग संधु, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक हरजितसिंघ कडेवाले, क्षेत्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष व सचिव, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.
नांदेड येथील या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशीव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश राहणार आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे पाच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजन व पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, विविध पार्किंगसाठी मैदानाचे सर्वेक्षण सुरू आहे. संबंधित विभागांनी याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिल्या. भाविकांना रेल्वे, बस व इतर वाहनाने शहरात येण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेण्यात आला. यासह बांधकाम विभागाने गुरुद्वारा परिसरातील रस्ते, नाल्या व इतर सोपविलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नांदेड शहरात “हिंद-की-चादर”श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांमार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांने कार्यक्रमाच्या अनुषंगाने हेलिपॅड, मंडप, ग्राऊंड दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, तात्पुरते स्वच्छता गृह इ. कामे करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, भाविकांना सर्व सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणानी नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
