“अमृता – इमरोज समजून घेताना ” ने घेतला मनाचा ठाव :  पात्रं विसरून मनामनात ओथंबला केवळ प्रेमभाव ! 

नांदेड : वर्तमान मानवी जीवन हे प्रचंड अस्वस्थ झाले आहे. संशय , असमाधान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना माणूस स्वत्व आणि प्रेमभाव विसरत आहे. हिंस्त्र स्वभाव वाढीस लागल्याने आपलेपणा शुष्क होऊ लागला आहे . त्यामुळे माणूस गर्दीत असूनही एकाकी जीवन जगत आहे . अशा अनैसर्गिक एकाकी जीवनाला प्रेमाच्या ओलाव्याची साद घातली आहे ती

‘अमृता इमरोज समजून घेतांना -एक शोधयात्रा’

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने.

कार्यक्रम आटपून बाहेर पडणारा प्रत्येक श्रोता या प्रेमगाथेतील पात्रांच्या काळजातला निस्सीम

प्रेमभाव आपल्या काळजात घेऊन निघाला होता , ही या कार्यक्रमाची फलश्रुती ठरली .

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान नांदेड आयोजित आणि ज्येष्ठ लेखिका डॉ वृषाली किन्हाळकर यांनी उमा त्रिलोक यांच्या ” ती आहेच ” या मराठी अनुवादित पुस्तकावर चर्चा संवादाचे नुकतेच आयोजन केले होते . प्रेम रसात न्हाऊन निघालेल्या या हृदयस्पर्शी कार्यक्रमात प्रारंभीच प्रतिष्ठानच्या वतीने नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प पूजन करण्यात आले . त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्षा सौ. श्यामल पत्की आणि दीपनाथ पत्की यांनी मान्यवर लेखक सादरकर्त्यांचा सत्कार केला .

मनामनात प्रेमभावाचे जागरण करणारी, या संवाद सोहळ्याची संकल्पना प्रा. मेघना यंदे आणि राम तरटे यांनी साकारली होती.

अमृता – इमरोज समजून घेताना एक शोधयात्रा मध्ये ” ती आहेच” या पुस्तकाच्या अनुवादिका डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी इमरोज या दुर्लभ, लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाबद्दल मनमोकळेपणाने आपले मत उपस्थितांसमोर अलगद ठेवले. नि: स्वार्थ प्रेम करणे ज्याला जमलं ती व्यक्ती म्हणजे इमरोज . इमरोज या फारसी शब्दाचा अर्थ म्हणजे आज.

इमरोज म्हणजे वर्तमान . आपण प्रत्येक जण वर्तमानात आणि आज मध्ये जगले पाहिजे . अमृता प्रीतम यांचे साहिर यांच्यावर असलेले जीवापाड प्रेम देखील इमरोज यांनी उदार अंतःकरणाने समजून घेतले . जे तिला आवडते ते सर्व माझेही आहे, आणि मलाही प्रिय आहे, असे ते म्हणायचे. इतके सहज सुंदर आयुष्य ते जगले. तिच्या प्रत्येक सुखदुःखात ते कायम सोबत राहिले . अमृता तरुण असताना, तिचा प्रियकर , साथी तर ते होतेच, पण तिच्या हातचा गरम गरम पराठा खाताना कधी लहान मूल होऊन जाणारे इमरोज, अमृता आजारी असताना मात्र तिची आई होऊन , तिची नर्स होऊन सेवा करत राहिले . अमृताच्या शेवटच्या श्वासापर्यंत इमरोज, अमृता प्रीतम सोबतच राहिले.

हे ऐकताना उपस्थितांच्या काळजाला प्रेमाचे पाझर फुटले होते. हा नि: स्वार्थ प्रेमभाव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला पाहिजे . आपल्या जोडीदारावर मालकी हक्क न दाखवता, जोडीदाराला संपूर्ण स्वातंत्र्य देत, तिच्याशी/ त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. हे असं

एकरूप होणं, प्रत्येकाला जमलं तरच आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्धी मिळेल . यासाठी प्रत्येकाने प्रेमभाव समजून घ्यावा. नि: स्वार्थपणे फक्त प्रेम आणि प्रेमच करावं, अशी भावनिक साद डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी यावेळी घातली.

संवेदनशील कवी प्रा. मनोज बोरगावकर यांनी अमृता प्रीतम यांच्या मनातील अनेक नाजूक विषयांवर हळुवार फुंकर घालत तत्कालीन परिस्थितीत तिच्या

” स्वातंत्र्य ” या पुरोगामी भूमिकेचा अभिमानाने उल्लेख केला. जगाचा निरोप घेण्यापूर्वी इमरोज साठी तिने लिहिलेली कविता ही अजरामर ठरली . ” मी पुन्हा भेटेन ” ही तिची आश्वासक अंतर्मनाचाची हाक ऐकताना उपस्थितांची मने व्याकुळ झाली होती.

आपल्या ओघवत्या आणि सहज मांडणीतून प्रा. विश्वाधार देशमुख यांनी साहिरचे निरागस परंतु तणावपूर्ण बालपण आणि त्यामुळे बदलून गेलेले त्यांचे आयुष्य सभागृहासमोर ठेवले . अमृताला न स्वीकारण्यामागचे त्यांच्या बालमनावरील दडपणाचे पडदे त्यांनी हळुवार उघडले . साहिर यांच्या आयुष्यात अमृतासह चार स्त्रिया आल्या . पाचवी स्त्री त्यांची आई . अन्य स्त्री आपल्या जीवनात आली तर आपल्या “अम्मी ” वरचं आपलं प्रेम कमी होईल या भीतीपोटी प्रेम न स्वीकारणारे साहिर शाश्वत मातृप्रेमात मात्र न्हाऊन निघाले, हे सांगताना प्रेमाची उंची गगनाला भिडली होती ; तर हे प्रसंग ऐकताना उपस्थितांच्या मनातही गहिवर दाटला होता.

शिवाजी आंबुलगेकर यांनी ही अत्यंत नेटकेपणाने समारोप साधला . सूत्रसंचालकाविनाच साकारलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना राम तरटे आणि प्रा. मेघना यंदे यांनी प्रेममय भावनेने, ओथंबून गेलेल्या सभागृहासमोर मांडली. कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना स्वादिष्ट दुधाचा आस्वादही घेता आला .

‘अमृता – इमरोज समजून घेताना ‘

हा कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडलेला प्रत्येक श्रोता इमरोज , अमृता , साहिर या पात्रांना आपल्या काळजावर कोरुन घेऊन, प्रेमभाव मनात जागवत निघाला होता, ही या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने यशस्वीता ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!