नांदेड (प्रतिनिधी)- जगण्याच्या उमलत्या वयात, एका निष्पाप तेरा वर्षीय बालिकेच्या आयुष्याची जणू काळानेच होळी केली. मध्यरात्रीच्या भयाण अंधारात जंगलाच्या कुशीत नेऊन तिच्यावर विकृतीचा कळस गाठणाऱ्या नराधमाला नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावून, न्यायाच्या मंदिरात न्यायाची तोफ वाजवली आहे.
7 जून 2023 रोजी किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेत, महेश धोंडीबा भडंगे या नराधमाने रात्रीच्या अंधारात तेरा वर्षीय बालिकेला दुचाकीवर जंगलात नेले. तिच्यावर आधी अत्याचार आणि नंतर अनैसर्गिक अत्याचार करून, ती जीवंत शवासारखी गावाजवळ रस्त्यावर टाकून पलायन केले. त्या बालिकेच्या शरीरावर क्रौर्याच्या खोल जखमा कोरल्या गेल्या होत्या.
पिंपळाच्या पानासारख्या थरथर कापत, ती बालिका आपल्या घरी पोहोचली आणि आईच्या कुशीत फुटणाऱ्या आसवांत तिने आपल्या वेदनांचा उद्गार केला. बालिकेचे वडील घरी नसल्याने तक्रार थोडा विलंबाने, पण तो विलंब विश्लेषित करून 8 जून 2023 रोजी दाखल करण्यात आली.
किनवट पोलिसांनी IPC कलम 376(AB), 377, पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6 आणि अन्य गुन्हे दाखल करत महेश भडंगे याला अटक केली. तपासाधिकारी पीएसआय मिथुन सावंत यांच्या प्रभावी तपासानंतर, सरकारी वकील अॅड. मनीकुमारी बत्तुला {डांगे} यांनी न्यायालयात घणाघाती युक्तिवाद सादर केला.
फैसला इतिहासात कोरला जाईल …
उपलब्ध वैद्यकीय आणि प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांवर न्यायालयाने आपला निर्णय दिला. न्यायमूर्ती सुनील वेदपाठक यांनी आरोपी महेश धोंडीबा भडंगे यास खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
IPC कलम 376(AB) अन्वये: 20 वर्षे सक्तमजुरी व ₹3,000 दंड
पोक्सो कायदा कलम 6 अंतर्गत: नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप व ₹4,000 दंड
IPC कलम 377 अंतर्गत: 10 वर्षे सक्तमजुरी व ₹4,000 दंड
ही संपूर्ण शिक्षा आरोपीने एकत्रितपणे भोगायची आहे.
न्यायालयाने बालिकेला कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी स्पष्ट शिफारसही केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील पहिलाच ऐतिहासिक निर्णय
या खटल्यातील शिक्षा ही नांदेड जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासातील पहिली नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतची जन्मठेप असल्याची माहिती असून, समाजमन ढवळून टाकणाऱ्या या प्रकरणात असा निर्भीड निर्णय अत्याचाऱ्यांसाठी इशारा ठरणार आहे.
“हा फक्त निकाल नाही, ही सामाजिक न्यायाची नांगरलेली रेष आहे – जी पिढ्यानपिढ्या लक्षात राहील.
