क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातही सध्या राजकारणाचा हस्तक्षेप वाढलेला दिसतो. मागील आशिया कप क्रिकेट सामन्यांमध्ये याचे स्पष्ट दर्शन घडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला, पण त्या सामन्यांदरम्यान आणि आजूबाजूला जे काही घडले, ते केवळ क्रिकेटपुरते नव्हते; त्यात राजकीय छटा स्पष्टपणे जाणवत होती.

सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेत वनडे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी शुभमंगल यांना संधी देण्यात आली. शुभमंगल उत्कृष्ट खेळाडू आहेत, हे मान्य आहे, पण रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूचा इतक्या सहजपणे आणि अचानक वगळला जाणं, हे योग्य वाटत नाही.या मागे भाजप खासदार आणि भारतीय संघाचे प्रमुख कोच गौतम गंभीर यांचा हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे. याआधी विराट कोहलीबाबतही त्यांनी वागलेलं वर्तन वादग्रस्त ठरलं होतं. परिणामी, विराट कोहली आता वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाहीत. त्यांच्या प्रतिभेला उतार आलेला नाही, हे सर्वमान्य असतानाही त्यांना संधी दिली जात नाही, यावरून त्यांना हेतुपुरस्सर संघाबाहेर केलं गेलं, हे स्पष्ट होतं.

एकेकाळी “खेळाडूंचा सन्मान व्हावा” असं सांगणारे गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ते झाल्यावर स्वतःच बदलले. त्यांनी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून, शुभमंगलला वनडे संघाचं नेतृत्व दिलं. खरं पाहता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बहुतेक वनडे सामने जिंकले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत फक्त एक सामना – तोही ऑस्ट्रेलियाविरुद्ध – हरला गेला होता. त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं ठोकलेली आहेत आणि १६ वर्षं देशासाठी खेळले आहेत. त्यांना एक सन्मानजनक निरोप मिळायला हवा होता.माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनीही यावर मत व्यक्त करताना म्हटलं, “कर्णधार बदलण्यामागे हेतू असतो, पण ज्या पद्धतीने रोहित शर्माला हटवलं गेलं, ते चुकीचं आहे.” त्यांनी अजून हेही सांगितलं की, मालिका संपल्यानंतरही कर्णधार बदल शक्य होता.

पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या वक्तव्यात असं म्हटलं की, “क्रिकेट असो वा युद्धभूमी, निर्णय एकच — भारताचा विजय.” हे वक्तव्य अर्धसत्य आहे. ज्या जवानांवर हल्ला झाला त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी केली होती. मात्र, ती दुर्लक्षित झाली आणि सामना खेळला गेला. यातही राजकारण खेळलं गेलं.हे सगळं घडत असताना सूर्यकुमार यादवने आशिया कप नंतर दिलेलं वक्तव्य अधिकच राजकीय वाटलं. त्यांनी सांगितलं की, “नेते जेव्हा फ्रंट फुटवर असतात, तेव्हा खेळाडूही तसंच खेळतात.” जर असंच असेल, तर २०२० मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, जेथे पंतप्रधान स्वतः उपस्थित होते, भारत का हरला? त्या सामन्यात सूर्यकुमार यादवचं प्रदर्शन चांगलं होतं, तरी अंतिम सामना भारत हरला होता. मग त्यांचं वक्तव्य केवळ राजकीय नाही तर दिशाभूल करणारेही ठरते.
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंनी कधीच राजकीय वक्तव्य केलं नाही. सचिन तेंडुलकरसुद्धा खेळात असताना राजकारणापासून दूर होते, पण निवृत्तीनंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना खासदार बनवले आणि त्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली. अशीच अवस्था इतर कलाकारांचीही झाली आहे – आशा भोसले, अक्षय कुमार, अनुपम खेर यांच्यासह अनेक जण याचे उदाहरण आहेत.मात्र आजही विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्माने राजकीय वक्तव्ये टाळलेली आहेत. विशेष म्हणजे, एका क्रिकेट सामन्यात मोहम्मद शमीला समाज माध्यमांवर टार्गेट करण्यात आलं, तेव्हा विराट कोहली त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्या वेळी एका आयटी अभियंत्याने कोहलीच्या लहान मुलीला बलात्काराची धमकी दिली होती. ही घटना म्हणजे क्रिकेट आणि धर्म-राजकारण यामधील घातक मिश्रण आहे.

आज विराट कोहली टी-२० संघातूनही बाहेर पडतो का, यावर चर्चा सुरू झाली आहे. गौतम गंभीर निवड समितीत आल्यापासून अनेक बदल झाले. भारतीय क्रिकेट संघ आजवर राजकारणापासून दूर राहिला होता, पण आता तिथेही राजकीय हस्तक्षेप स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
अजित आगरकर यांनाही यावर प्रश्न विचारले गेले. तीन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी तीन कर्णधार ठेवणे कठीण असल्याचं त्यांनी मान्य केलं. शुभमंगलला तयार होण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असं ते म्हणाले. त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ विश्वचषकासाठी खेळतील, असं स्पष्ट केलं. पण सध्या संघाचं लक्ष २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपकडे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.रोहित शर्माने ५६ वनडे सामने खेळले असून, त्यातील ४२ सामने जिंकले आहेत — म्हणजेच त्याची विजयाची टक्केवारी ७६% आहे. त्याला सन्मानाने निरोप मिळायला हवा होता, पण तसं झालं नाही. गौतम गंभीर यांच्या लहानशा राजकीय विचारसरणीमुळे असा अन्याय झाल्याचं अनेकांचं मत आहे.
