लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी अटकेत – २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

हदगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरीसाठी सोलार, तुषार सिंचन व ठिबक सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी बालासाहेब पुंडलिकराव सूर्यवंशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नांदेड शहरातील चैतन्य नगर भागात नंदी हॉटेलमध्ये करण्यात आली.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी तक्रारदार व्यक्तीला स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. मात्र विहिरीवरील सोलार व सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी बालासाहेब सूर्यवंशी यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भातील पडताळणी १ ऑक्टोबर रोजी मनाठा तालुका, हादगाव येथे करण्यात आली.

 

संध्याकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास चैतन्य नगर परिसरातील नंदी हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना सूर्यवंशी यांना लाचेच्या २० हजार रकमेसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २,६०० रुपये रोख, ओळखपत्रे, आधार कार्ड व पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांचे राहते घरही झडतीसाठी घेण्यात आले आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे, प्रशांत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!