आता 9 नोव्हेंबर रोजी होणार राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
पुणे– महाराष्ट्रातील विशेषत: संपुर्ण मराठवाडा, विदर्भासह सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीसह जवळपास वीसहुन अधिक जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात निवेदन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे आयोगाकडून कळविण्यात आले.
एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी भावी अधिकारी तसेच मार्गदर्शक,पालकांच्या प्रतिकिया
विद्यार्थी देशाचा आधारस्तंभ तर शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पावसामुळे पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना फायदा होणार असला तरी पालकांसाठी नुकसानभरपाई लवकर मिळवी यामुळे देशाची जीवनरेखा सुधारेल. नाहीतर हा काळ चिंतेचा ठरेल.
– स्वाती डाकेवाड- बुटनवाड , विद्यार्थीनी प्रतिनिधी (नांदेड)
महाराष्ट्रातील सध्याची पूरस्थिती पहाता आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
– अफसर एस. अफसर (पुणे)
बातम्यांतून समजते आहे पावसामुळे एमपीएससीचा अभ्यास करणा-या विद्यार्थांचे शैक्षणिक संदर्भ साहित्य महापुरात वाहून गेले, कित्येकांचे घर – शेती वाहून गेली. त्यांना दिलासा मिळेल परीक्षा पुढे ढकलली निर्णय समाधानकारक आहे.
– गोविंद मोरे विद्यार्थी प्रतिनिधी (बार्शी सोलापूर)
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली या निर्णयाचे स्वागत आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई लवकर मिळावी हि विनंती.
– डिगांबर मांडवगणे (माजलगाव, बीड)
राज्यात सर्वत्र नैसर्गिक आपत्तीकारणास्तव महापुर, पूरपरिस्थिती आहे. पण संविधानात अनुच्छेद १६ नुसार ‘सर्वांना समानतेची संधी’ अशी तरतूद आहे म्हणूनच सरकार आणि आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली असे मानतो.
एस.एन.नांदेडकर सर (स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक)
पावसामुळे परीक्षा पुढे जाण्याच्या निर्णयामुळे आम्हां पालकांमध्ये आनंद, चिंता व दिलासा अशा तिन्ही भावना उमटल्याचे अदृश्य प्रतिबिंब आहे.
शशिकांत अहिवळे (पालक प्रतिनिधी)
