नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत पावसाचे थैमान सुरूच असून विष्णुपूरी जलाशयातून 1 लाख 60 हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू असून पुढच्या काही तासांमध्ये 3 लाख क्युसेक्स होणार आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. काही जणांना अडकलेल्या पाण्यातून प्रशासनाने जिवरक्षक दलाच्या मदतीने बाहेर काढले आहे. एका व्यक्तीचा विज पडून मृत्यू झाला आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने जनतेलाा सुध्दा विनंती करण्यात येत आहे की, सध्या पावसाच्या आणि पुराच्या पाण्याला दचकूनच जण्याची गरज आहे. आपल्या स्वत:च्या आणिय आपल्या शेजाऱ्यांच्या जिवाची रक्षा करणे आपलीच जबाबदारी आहे.
आजच्या परिस्थितीत पासदगाव पुल आसना नदीचे पाणी वाढल्याने बंद झालेला आहे. शहरातील संत दासगणु पुल बंद आहे. एकदरा नांदेड या गावांचा संपर्क तुटलेला आहे. पळसी येथे पाण्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला प्रशासनाने मदत करून बाहेर काढले आहे. सोनखेड जवळ दगडगाव येथे आनंदराव नावाचे व्यक्ती झाडावर पाण्यात अडकले होते. गोदावरी जीवरक्षक दलाचे नुर मोहम्मद, आशफाक, मुस्ताक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदरावला बाहेर काढले आहे. वृत्त लिहिपर्यंत सुध्दा पाऊस सुरू आहे आणि सुरू राहणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या गोदावरी नदीची पातळी 351 मिटर अर्थात धोक्याच्या पातळीला पोहचलेली आहे. पुढे विसर्गात 3 लाख क्युसेक्स अशी वाढ झाली तर ही पाण्याची पातळी अजून वाढणार आहे. विष्णुपूरी धरणाचे 16 दरवाजे उघडे आहेत.
प्रशासनाने सुध्दा अतिवृष्टी बाबत दिलेल्या माहितीनुसार नांदेड तालुक्यातील 5, बिलोली 3, मुखेड 5, कंधार 4, लोहा 5, मुदखेड 2, नायगाव 1 अशा 25 महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर पुलावरून पाणी वाहत आहे. अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथील संतोष धोंडीबा काकडे यांच्या मालकीची एक म्हैस वीज पडून मरण पावली आहे. शेलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मुखेड तालुक्यातील मौजे शिकारा गावात एका घरावर पिंपळाचे झाड पडले आहे. पण जिवीत हाणी झालेली नाही. मौजे देगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे बाऱ्हाळी-मुक्रामाबाद, निवळी आणि बेरळी गावाला जाणारे रस्ते बंद झाले आहेत.
लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे उमरा ते रुपसिंग तांडा, परसराम तांडाकडे जाणारी वाहतुक बंद आहे. उमरा गावापासून पुराचा प्रवाह 200 मिटर लांब आहे. अद्याप घरांमध्ये पाणी शिरलेले नाही. देऊळगाव व चितळी येथील ओढ्यास पुर आल्यामुळे रस्ता बंद आहे. धनज, निळा, डेरला, लोंडेसांगवी, जोशीसांगवी या गावांचा संपर्क तुटलेला आहे. डोंगरगाव येथील घोटका जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन मंदिरात पाणी शिरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत पाणी आले आहे. मंदिरातील कुटूंबाला सुरक्षीत ठिकाणी आसरा देण्यात आला आहे. चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. दोन्ही ठिकाणातून वाहतुक बंद आहे. धानोरा-खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुरात झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध व बचाव पथकाने बाहेर काढले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही रस्ते बंद आहेत. देगलूर तालुक्यात सध्या पाऊस थांबलेला आहे. तेथील 8 गावांचा संपर्क तुटलेला आहे. राहेगाव, वनेगाव, वरखेड हे मार्ग बंद आहेत. कासरखेडा मार्ग बंद आहे. तळणी ते रेगाव रस्ता बंद आहे. पिंपळगाव कोरका येथे कॅनॉल फुटल्यामुळे एक-दोन घरांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड शहरातील मोमीनपुरा, काळापुल, बाळगिर महाराज मठ, शनिमंदिर, हमालपुरा, दत्तनगर, गोकुळनगर येथे रस्त्यावर पाणी साचले आहे. शेवाळपिंपरी ते तळणी रस्ता बंद आहे.
आज 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विविध धरणातून विसर्ग होणारा पाणी साठा पुढील प्रमाणे आहे. जायकवाडी -38 हजार क्युसेक्स, माजलगाव-80 हजार क्युसेक्स, दिग्रस बंधारा-2 लाख क्युसेक्स, पुर्णा नदी(सिध्देश्र्वर, खडकपुर्णा, निम्न दुधना) 45 हजार क्युसेक्स, विष्णुपूरी 1 लाख 60 क्युसेक्स, नांदेड येथील जुन्या पुलावर पाण्याची पातळी 348.34 मिटर झालेली आहे. बाळेगाव बंधाऱ्यातून 2 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. जनतेने सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे आणि वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा असे आवाहन करत आहे.
पाऊस सुरूच; खंडीभर वर्षानंतर गोदावरी नदीचा रुद्रावतार जनता पाहत आहे
