“आय लव मोहम्मद” प्रकरण – एक सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर घडामोडींचा आढावा

“आय लव मोहम्मद” असे म्हणणे हे कोणत्याही दुसऱ्या धर्माचा अपमान ठरू शकते का? हे विधान धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कानपूर शहरातून सुरू झालेल्या या छोट्या प्रकाराने आता देशभरातच आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे.

प्रकरणाची सुरुवात

कानपूरच्या सय्यद नगर येथील रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जाफर वाली गल्लीत, 4 सप्टेंबर रोजी “I Love Mohammad” असा मजकूर असलेला एक बॅनर लावण्यात आला. पोलिसांच्या मते, यामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. तणाव वाढल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. समजूत काढून ते बॅनर हटवण्यात आले, मात्र लगेचच तेच बॅनर दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले.5 सप्टेंबर रोजी, वफात महिन्याच्या 12व्या दिवशी, म्हणजेच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा केला जात असताना, मिरवणुकीतही काही बॅनर व पोस्टर लावण्यात आले. यावेळीही काही पोस्टर फाडण्यात आले. पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले. एकमेकांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

गुन्हा दाखल आणि नंतरचा संघर्ष

या संपूर्ण घटनेवर 10 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. रावतपूर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर पंकज शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणात 24 लोकांची नावे नमूद करण्यात आली  त्यापैकी 9 ओळखीचे तर 15 अज्ञात होते.कानपूरचे एसीपी कपिल देव यांनी स्पष्ट केले की, “I Love Mohammad” लिहिल्यामुळे एफआयआर दाखल झालेला नाही, तर पारंपरिक जागेच्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणी बॅनर लावल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावरून रस्त्यांवर

यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर वेगाने पसरले. “I Love Mohammad” हा ट्रेंड झाला आणि सोशल मीडियावरून तो थेट रस्त्यांवर पोहोचला. देशभरातील विविध शहरांमध्ये निषेध नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील उन्नाव, लखनौ येथे महिलांनी विधानसभेसमोर पोस्टर घेऊन निदर्शने केली.कानपूरमध्ये दाखल झालेला एफआयआर भारतीय संविधानावर हल्ला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.  गायक तवसुर राणा यांच्या पुत्री  सुमैया राणा  यांसारख्या स्थानिक नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

इतर राज्यांतील प्रतिक्रिया

  • काशीपूर (उत्तराखंड): येथे हिंसाचार घडला, पोलिसांवरही हल्ला झाला. नदीम अहमद नावाच्या व्यक्तीसह 400 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला; सात जणांना अटक झाली.
  • गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश: येथेही विरोध प्रदर्शन झाले. 19 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये पोलिस ठाण्याजवळ हिंसक हालचाली घडल्या. त्यात 80 लोकांवर गुन्हे दाखल झाले.
  • नागपूर: मोमीनपुरा भागात  मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
  • हैदराबाद: खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत “I Love Mohammad” म्हटल्यामुळे गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवाल उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, जर हे गुन्हा मानले जात असेल, तर त्याची शिक्षा मला मान्य आहे.

राज्य सरकारांची आणि नेत्यांची मते

उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सांगितले की, संविधानाच्या चौकटीत राहून काय करायचे हे नागरिकांनी ठरवावे, अन्यथा गोंधळ होईल.मंत्री रघुराज सिंह यांनी वक्तव्य केले की, “लातों के भूत बातों से नहीं मानते”. भारतीय संविधान सर्वांना समान अधिकार देतो, त्यात धार्मिक स्वातंत्र्यही अंतर्भूत आहे. कोणालाही वेगळे मानलेले नाही.

एक चिंताजनक प्रश्न

5 सप्टेंबरला प्रकरण शांत झाल्यानंतर, 10 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्याची गरज काय होती? कोणाच्या दबावामुळे हे घडले? कानपूरच्या एका गल्लीतील घडलेला हा प्रकार देशभर कसा पसरला? यामागे कोणते हात आहेत, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

निष्कर्ष:

“I Love Mohammad” हा मजकूर, जो काहींसाठी श्रद्धेचा विषय आहे, तोच इतरांसाठी वादाचे कारण ठरला आहे. अशा घटनांमध्ये धर्म, भावना आणि कायदा या तिघांमधील संतुलन राखणे अत्यावश्यक ठरते. पोलिस, समाज, आणि सरकार यांनी या प्रकरणातून योग्य तो बोध घ्यावा आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!